दाभोलकर हत्या प्रकरण : जामिनाला विरोध करताना सीबीआयचा दावा
मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समिती संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडे हा समाजासाठी धोकादायक आहे. हिंदू विचारसरणीच्या सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्या श्रद्धा आणि रूढींना विरोध करणाऱ्यांना संपवण्याचा त्याचा हेतू होता, असा दावा करत सीबीआयतर्फे त्याच्या जामीन याचिकेला गुरुवारी उच्च न्यायालयात विरोध करण्यात आला.
दाभोलकर यांच्यासारख्या विचारवंताच्या हत्यांद्वारे सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या उजव्या विचारसरणीच्या गटांना समाजात दहशत पसरवायची होती, असा दावाही सीबीआयने प्रतिज्ञापत्रात केला आहे. एवढेच नव्हे, तर दाभोलकर यांच्यासह गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि एम. एम कलबुर्गी यांच्या हत्येशीही तावडे आणि प्रकरणातील अन्य आरोपींचा संबंध आहे. या सर्वसाधारण हत्या नाहीत तर दहशतवादी कृत्य होते. त्याच कारणास्तव आरोपींवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावाही सीबीआयने केला. तसेच तावडेला जामीन मंजूर केल्यास ते समाजासाठी धोक्याचे ठरेल. दाभोलकर यांच्या हत्या ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विचारांची हत्या मानली जात असल्याचेही सीबीआयने म्हटले आहे.