मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून त्यासाठी मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे कामही वेगात सुरू आहे. मुंबई महापालिकेची मुदत संपून जवळपास साडेतीन वर्षे पूर्ण झाली असून महापालिकेची निवडणूक होऊन आता आठ वर्षे झाली आहेत. या आठ वर्षांत मुंबईत मतदारांची संख्या १० लाखांनी वाढली आहे.
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित आहेत. सर्व महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये प्रभागांची रचना करून ती निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश नगर विकास विभागाने सर्व पालिकांना दिल्यानंतर प्रभाग रचनेच्या आराखड्याचे काम वेगात सुरू झाले आहे. गेल्या सात – आठ वर्षांत मुंबईत झालेल्या विकासकामांची नोंद त्यात करण्यात येत आहे. दुसरीकडे मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे कामही अखंड सुरू आहे.
मुंबई महापालिकेची मागील निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या कार्यकाळाची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली. नगरसेवकांच्या कार्यकाळाची मुदत संपून साडेतीन वर्षे झाली. मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडली त्याला आता साडेआठ वर्षे होऊन गेली आहेत. या साडेआठ वर्षांत मुंबईतील लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मतदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
किती मतदार वाढले ?
मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीच्या वेळी मतदारांची संख्या सुमारे ९१ लाख होती. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांची संख्या एक कोटी दोन लाखांवर पोहोचली. विशेष म्हणजे २०२३ मधील लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांच्या संख्येत मुंबई शहर भागात ५३ हजार ३७२, तर मुंबई उपनगरांत दोन लाख ३७ हजार ७१५ अशी एकूण दोन लाख ९१ हजार ०८७ ने वाढ झाली. या आकडेवारीवरून गेल्या आठ वर्षांत मतदारांच्या संख्येत जवळपास दहा ते साडेदहा लाखांनी वाढ झाली आहे.
१ जुलैपर्यंतची यादी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदारयादी तयार केली जात नाही. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली यादी वापरली जाते. १ जुलै २०२५ पर्यंत नावे नोंदवलेली यादी या निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच दिले आहेत. विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात पार पडली होती. त्यालाही आता सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे मतदारांची संख्या आणखी काही हजारांनी वाढणार आहे.
सर्वाधिक मतदार कुठे?
मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांमध्ये २०१७ मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी प्रत्येक प्रभागात सरासरी सुमारे ४० हजार मतदार होते. यंदाही प्रभागातील सरासरी मतदारांची संख्याही वाढणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मुंबईत सर्वाधिक मतदार उपनगरातील चांदिवली परिसरात असल्याचे आढळून आले होते. तर सर्वात कमी मतदार शहर भागातील वडाळा परिसरात होते.
नोव्हेंबर २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदारांची संख्या
- एकूण मतदार – १ कोटी २ लाख २९ हजार ७०८
- शहरात – २५ लाख ४३ हजार ६१० मतदार \ उपनगरात – ७६ लाख ८६ हजार ०९८ मतदार
- पुरुष मतदार – ५४ लाख ६७ हजार ३६१ \ महिला मतदार – ४७ लाख ६१ हजार २६५ \ तृतीयपंथी मतदार – १,०८२
फेब्रुवारी २०१७ मधील मतदारांची संख्या
- एकूण मतदार – ९१ लाख ८० हजार ४९१
- पुरुष मतदार – ५० लाख ३० हजार ३६१
- महिला मतदार – ४१ लाख ४९ हजार ७४९ तृतीयपंथी मतदार – ३८१
- प्रत्येक प्रभागातील सरासरी मतदार – ४० हजार ४४२