निवडणूक आयोगाचा दावा; राजकीय पक्षांच्या साक्षीनेच सर्व सोपस्कार

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पराभवाचा झटका बसलेल्या राजकीय पक्षांनी मतदानासाठी वापरलेल्या यंत्रांमध्येच (ईव्हीएम मशिन) घोटाळा झाल्याचा आरोप करुन, काही ठिकाणी आंदोलनेही केली. मात्र गोदामांमधून यंत्रे बाहेर काढण्यापासून ते मतदानानंतर ती सील करुन कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यापर्यंतचे सर्व सोपस्कार राजकीय पक्षांच्या साक्षीने केले जातात, त्यामुळे मतदान यंत्रांमध्ये घोटाळा होणे अश्यक आहे, असा दावा राज्य निवडणूक आयोगाने केला आहे.

मुंबईसह दहा महनगरपलिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपने मोठे यश मिळ्विले. पराभूत झालेल्या राजकीय पक्षांनी मात्र मतदान यंत्रांमधील घोटाळ्यांमुळे भाजपला एवढे मोठे यश मिळाले, असा आरोप करण्यास सुरुवात केली. मुंबई व पुण येथे मतदान यंत्रांमधील घोटाळ्याच्या विरोधात आंदोलनेही करण्यात आली. काही राजकीय पक्षांनी मतदान यंत्रांमार्फत घेण्यात येणारी मतदान पद्धती रद्द करावी, अशी मागणी केली आहे. साहजिकच निवडणूक प्रक्रिया राबविणाऱ्या राज्य निवडणूक आयोगालाही विरोधकांकडून अप्रत्यक्षरित्या जबाबदार धरण्यात येत आहे.

आयोगातील सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात महापालिका व जिल्हा परिषदांच्या एकूण ३ हजार २१० जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यांतील उमेदवारांची संख्या १७ हजार ३३१ इतकी होती. मतदानासाठी ४३ हजार १६० केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदानांसाठी ६८ हजार ९४३ यंत्रांचा वापर करण्यात आला होता. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी २ लाख ७३ हजार ८५९ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. जवळपास तेवढीच संख्या पोलिसांची होती व मतदान केंद्राच्या बाहेर त्यांचा पोलादी पाहरा होता. शिवाय सीसीटीव्ही  कॅमेरांची बारिक नजर होतीच. त्याचबरोबर मतदानाच्या प्रारंभापासून ते शेवटपर्यंत सर्वच राजकीय पक्षांचे वा उमेदवारांचे प्रतिनिधी मतदानकेंद्रात हजर होते. अशा कडक व्यवस्थेत मतदान यंत्रांमध्ये काही गैरप्रकार झाला असता, तर तो लगेच लक्षात आला असता, मात्र तसे काही घडले नाही, असे आयागाचे म्हणणे आहे.

मतदानाच्या आधी गोदामातून सील केलेली यंत्रे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बाहेर काढली जातात. त्यांच्या समोर यंत्रांची तपासणी केली जाते. एखादे यंत्र चालत नसेल तर ते बाद करून दुसरे यंत्र घेतले जाते. मतपत्रिका टाकून यंत्रांची चाचणी घेतली जाते. कोणते यंत्र कोणत्या मतदान केंद्रावर जाणार आहे, याची कुणालाही कल्पना नसते. यंत्रे उघडताना आणि मतदानानंतर ती  सील करताना त्यावर उपस्थित अधिकारी-कर्मचारी, उमेदवार वा त्यांचे प्रतिनिधी यांच्या स्वाक्षरी असतात. त्यामुळे मतदान यंत्रांमध्ये कसल्याही प्रकारचा घोटाळा होऊच शकत नाही, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्न्ो यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.