मुंबई आणि परिसरातील तापमानात हळूहळू घट होऊ लागली असली तरी थंडीसाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई आणि परिसरातील किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही गेल्या दोन ते तीन दिवसांत एक ते दीड अंशाची घट झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्राने रविवारी ३३ अंश सेल्सिअस कमाल तर २३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली. सांताक्रूझ केंद्राने ३३.३ अंश सेल्सिअस कमाल तर २०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली. पुढील दोन दिवसांत कमाल आणि किमान तापमानातही एक ते दीड अंशाची घट होण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे.

मराठवाडा, विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता

राज्यात सध्या संमिश्र वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात रात्रीचे तापमान पुन्हा कमी होत असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात त्यात वाढ झाली आहे. कोकण विभागात किमान तापमान सरासरीच्या आसपास आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा आणि विदर्भात मंगळवारनंतर पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत असून, ते ओमानच्या दिशेने सरकत आहे. या क्षेत्रामुळे राज्याच्या विविध भागांत या आठवडय़ात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. निरभ्र आकाश, कोरडय़ा हवामानाबरोबरच उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरू झाल्यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडी अवतरली होती. मात्र, वातावरण ढगाळ झाल्याने संपूर्ण राज्यात तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली. सध्या हवामानाची संमिश्र स्थिती आहे. विदर्भातील रात्रीचे किमान तापमान बहुतांश भागात पुन्हा सरासरीच्या खाली गेले आहे. रविवारी अकोला येथे राज्यातील नीचांकी ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात मात्र रात्रीचे तापमान सरासरीच्या तुलसनेत २ ते ५ अंशांनी अधिक असल्याने थंडी पूर्णपणे गायब झाली आहे.

पुढील काळात मध्य महाराष्ट्र आणि कोकणात कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. २५ नोव्हेंबरला विदर्भात काही ठिकाणी, तर २६ नोव्हेंबरला विदर्भासह मराठवाडय़ात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wait a few days for the cold abn
First published on: 23-11-2020 at 00:17 IST