लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे – कुर्ला संकुल येथे मिठी नदी काठी मनोरंजन केंद्र आणि क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या मनोरंजन केंद्राची आणि क्रीडा संकुलाची ‘बाधा – वापर – हस्तांरित करा’ या तत्त्वावर उभारणी करण्यासाठी एमएमआरडीएने मे महिन्यात स्वारस्य निविदा मागविल्या होत्या. मात्र निविदेला वारंवार मुदतवाढ देण्यात येत असल्याने या प्रकल्पाला विलंब होण्याची चिन्हे आहेत.
बीकेसीतील जी ब्लॉकमध्ये मिठी नदीलगत ‘आर.जी.२३ अ’ आणि ‘आर.जी.२३ ब’ येथे ८.३७ हेक्टर आणि ‘आर.जी. ६’ येथे २.४७ हेक्टर अशी एकूण १०.८४ हेक्टर जागा आहे. ही जागा मनोरंजन केंद्रासाठी आरक्षित आहे. या जागेवर एमएमआरडीएने मनोरंजन केंद्र आणि क्रीडा संकुल उभरण्याचा निर्णय घेतला आहे. या संकुलाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मनोरंजन केंद्र आणि क्रीडा संकुलाच्या इमारतीच्या गच्चीवर दोन हेलिपॅडही बांधण्यात येणार आहेत. तसेच हवाई रुग्णवाहिका तळ म्हणूनही या हॅलिपॅडचा वापर करण्यात येणार आहे.
आणखी वाचा-मुंबई: मागाठाणे मेट्रो स्थानकातील प्रवेशद्वार दोन महिन्यानंतर खुले
यासंबंधीच्या प्रस्तावाला प्राधिकरणाच्या १५४ व्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. ‘बांधा – वापर – हस्तांतरित करा’ या तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएने मेमध्ये निविदा मागविल्या होत्या. मनोरंजन केंद्र आणि क्रीडा संकुलातून उपलब्ध होणाऱ्या महसुलापैकी अधिक निधी एमएमआरडीएला देणाऱ्या निविदाकाराला हे कंत्राट देण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही जागा ३० वर्षांसाठी संबंधित कंत्राटदाराला देण्यात येणार आहे.
मे महिन्यात काढण्यात आलेल्या निविदेनुसार १७ जूनपर्यंत स्वारस्य निविदा सादर करण्याची मुदत होती. मात्र या निविदेला मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही जुलैमध्ये निविदेला मुदतवाढ देण्यात आली असून आता पुन्हा मुदतवाढ देण्याची नामुष्की एमएमआरडीएवर ओढवली आहे. निविदा सादर करण्याची शेवटची मुदत ४ सप्टेंबर होती. या निविदा ६ सप्टेंबर रोजी उघडण्यात येणार होत्या. पण आता निविदा सादर करण्यासाठी २९ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आता ३ ऑक्टोबर रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत. इच्छुक कंपन्यांचे काही प्रश्न असून त्यांचे निरसन करण्यात येत आहे. यासाठीच निविदेला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएनच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या मुदतवाढीमुळे प्रकल्पास विलंब होण्याची चिन्हे आहेत.