मुंबई : आठवडाखेरीज मुसळधार पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, शनिवारी सतर्कतेचा इशारा असताना मुंबईत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
मुंबई शहर आणि उपनगरांत शुक्रवारी मध्यरात्री काही ठिकाणी किरकोळ पाऊस पडला. त्यानंतर शनिवारी तीच परिस्थिती कायम होती. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत होते. मुंबईतील काही भाग पावसाळी ढगांनी व्यापले होते. मात्र, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सांताक्रूझ केंद्रात ५.५ मिमी आणि कुलाबा केंद्रात ७.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. ठाणे, नवी मुंबई, रायगड, पुणे, सातारा, नाशिक, दक्षिण कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यासह पुढील काही दिवसांत पावसाच्या सरींची तीव्रता वाढू शकते, अशी माहिती हवामान अभ्यासकांकडून देण्यात आली.
गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र घाट भागात आणि मराठवाडय़ात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला. यासह काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. पुढील पाच दिवसांत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. ओडिशा आणि आसपासच्या क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत द्रोणीय क्षेत्र आहे. परिणामी, पुढील पाच दिवसांत कोकण किनारपट्टीवर, मध्य महाराष्ट्र घाट भागात आणि मराठवाडय़ात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक जयंत सरकार यांनी सांगितले. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत १३ जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे.
हिंगोली, नांदेडमध्ये रौद्ररूप
हिंगोली, नांदेड : हिंगोली तालुक्यातील कुरंदा व परिसरात शुक्रवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. गावात आसना नदीचे पाणी शिरल्याने एक हजारपेक्षा अधिक ग्रामस्थांचे स्थलांतर करावे लागले. जनावरे वाहून गेली. मातीची घरे पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी संवाद साधत ग्रामस्थांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.