उन्हाची काहिली आणि पावसाच्या आगमनाबाबत अनिश्चितता यामुळे मुंबईकर चिंतित पडले आहेत. त्याच वेळी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ६० दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झाल्याने पालिकेचेही पावसाकडे लक्ष लागले आहे. मात्र पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यास जूनच्या दुसऱ्या पंधरवडय़ात मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणामधून मुंबईकरांना दर दिवशी ३,७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. आजघडीला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये २.२६ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. सात तलावांपैकी अप्पर वैतरणातील उपयुक्त पाण्याचा साठा संपुष्टात आला आहे. मात्र उर्वरित तलावांतील पाणीसाठय़ामुळे  मुंबईकरांना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत एकटय़ा भातसामधून ५९ टक्के पाणी उपलब्ध केले जाते. या तलावातील पाणीसाठय़ाची कमाल क्षमता १४२ मीटर, तर किमान पातळी १०४.९० मीटर इतकी आहे. सध्या या तलावातील पाण्याची पातळी १०८.७० मीटर इतकी आहे. अशीच अवस्था अन्य तलावांची आहे.
सध्या तलावांमधील पाणी मुंबईकरांना ६० दिवस पुरेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पाऊस लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्यास काही प्रमाणात पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water cut
First published on: 05-06-2015 at 05:06 IST