मुंबई : सोमवारी सकाळपासून मुंबईत पावसाने जोर धरला होता. पावसाने जोर धरताच बई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ मार्गिकेवरील चकाचक अंधेरी पश्चिम स्थानकात गळती सुरु झाली. तर गळती होत असलेल्या ठिकाणी चक्क रंगीबेरंगी बादल्या लावल्याचे चित्र होते. तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना सतत पाणी पुसावे लागत असल्याचेही दिसत होते.

मेट्रो प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प असल्याचे सातत्याने सांगितले जाते. अत्याधुनिक सुविधा असलेली मेट्रो स्थानके असल्याचेही सांगितले जाते. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेट्रो स्थानकांमध्ये गळती होण्याचे प्रकार काही थांबताना दिसत नाहीत. उन्नत मेट्रो मार्गिका असो वा भुयारी मेट्रो मार्गिका मेट्रो मार्गिकांच्या स्थानकांमध्ये गळती होत असल्याचे प्रकार सातत्याने घडताना दिसतात. मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे) मार्गिकेवरील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक तर मे महिन्यात पूर्णत पाण्याखाली गेले होते.

पाणी शिरल्याने सर्व यंत्रणा बंद पडल्याने पाच दिवस स्थानक बंद करण्याची नामुष्की मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) वर आली होती. बीकेसी मेट्रो स्थानकावरही गळती होत असलेल्या ठिकाणी बादल्या ठेवण्यात आल्या होत्या. यावरुन खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकार आणि एमएमआरसीवर टीका केली होती. मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेवरही गळती होण्याचे प्रकार दिसून येतात. याआधीही गोरेगाव स्थानकावरही गळती झाली होती. अशात आता सोमवारी मुसळधार पावसात मेट्रो २ अ मार्गिकेवरील अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानकावर गळती झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यावरणप्रेमी झोरु बाथेना यांनी समाजमाध्यमांवर अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानकातील गळतीची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. दुपारच्या वेळेस या मेट्रो स्थानकांवरुन प्रवास करताना आपल्याला हे चित्र दिसल्याचेही त्यांनी सांगितले. स्थानकावर काही ठिकाणी रंगीबेरंगी बादल्या लावण्यात आल्या होत्या. तर काही ठिकाणी कर्मचारी पाणी पुसण्याचे काम करत असल्याचे चित्र होते असेही त्यांनी सांगितले. याबाबत एमएमआरडीएकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.