राज्य सरकारची पालिकेला परवानगी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भविष्यातील आणखी ५ टक्के पाणीकपात लक्षात घेता, भातसा आणि अप्पर वैतरणा तलावातील राखीव पाणीसाठाच मुंबईची तहान भागवणार आहे. राखीव पाणीसाठा वापरण्यासाठी पालिकेने सादर केलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पाणीकपातीच्या टक्केवारीत होणारी वाढ टळणार आहे.

जूनअखेर राखीव कोटय़ातील पाणी वापरण्यात येणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तलावांत समाधानकारक पाऊस झाला नाही. तलावांत या वर्षी दोन लाख दशलक्ष लिटर पाणी कमी आहे. त्यामुळे पालिकेने १५ नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे तलावांतील पाण्याची पातळीही झपाटय़ाने घसरत आहे.

सध्याचा पाणीसाठा हा जुलैपर्यंतच पुरणारा असला तरी मुंबईत आणखी पाच टक्के पाणीकपात होण्याची शक्यता होती. त्यामुळे पालिकेने राज्य सरकारकडे भातसा आणि अप्पर वैतरणा तलावातील राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी देण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. याला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आवश्यकता भासल्यास राखीव पाणीसाठा वापरण्यास शासनाने पालिकेला परवानगी दिली आहे. यामुळे अधिकच्या पाणीकपातीची आवश्यकता भासणार नाही. मात्र मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेने केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water resource management
First published on: 23-04-2019 at 02:27 IST