राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज त्यांच्या कार्यकर्ते आणि महानगरपालिकेच्या संभाव्य उमेदवारांना मोलाचा सल्ला दिला आहे. “मुंबईचं महत्त्वं कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु, लोकांसोबत कनेक्ट वाढवल्या, त्यांची कामं करून दिल्यास तुमचा विजय पक्का होईल.” आज ते घाटकोपर येथे राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ता शिबिरात बोलत होते.

“मुंबईचे प्रश्न समजले पाहिजेत. पण इथं एकाच वेळेला सर्व कामं काढली जातात. रस्ता, मेट्रो, इमारतीची कामं, धूळ वाटेल तेवढी आहे. जिथे अर्धा तास लागतो तिथे दोन दोन तास लागतात. गाड्या पुढे जातच नाही. ट्राफिक वाढलं आहे. आता सुद्धा एवढी उष्णता वाढली आहे की वीजेची मागणी वाढली आहे. ज्यांना निवडणुकीला उभं राहायचं आहे, ज्यांना निवडून यायचं आहे त्यांनी आपल्या वॉर्डात केलं पाहिजे. मला मुंबई निवडणुकीचा चांगला अनुभव आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक होतं, विधानसभेच्या निवडणुकीत दुसरं आणि लोकसभेच्या निवडणुकीत तिसरंच घडतं. पण तुम्ही लोकांसोबत कनेक्ट असाल तर निवडणुकीत अडचणी निर्माण होत नाहीत”, असं छगन भुजबळ म्हणाले.

हेही वाचा >> “मुंबईचं नी माझं नातं काय?”, मुंबईकरांचे आभार मानत सुप्रिया सुळे आठवणीत रमल्या; म्हणाल्या, “या शहरानं आम्हाला…”

“मी शिवसेनेत होतो. मला माहितेय गटर साफ करून दिलं तर फलकावर लिहिलं जायचं शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानुसार गटार साफ केलं म्हणून. ही गोष्ट आपल्यासाठी हास्यास्पद असेल. पण, गटराच्या दुर्गंधीतून सुटका मिळाली ही किती मोठी गोष्ट आहे. वॉटर, गटर आणि मीटर हेच सर्वांत महत्त्वाचे तीन प्रश्न आहे. या प्रश्नांना हात घातला पाहिजे. राजकारणाबाबत काहीही बोला, पण, लोकांसमोर कनेक्ट होत नाही तोपर्यंत निवडणुकीत अडचणी निर्माण होतात, असंही ते पुढे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी त्यांनी शेर-ओ-शायरीही केली. उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवण्याकरता ते म्हणाले की, “मेरें बारे कोई राय मत बनाना गालिब, एक दौर ऐसा भी आएगा मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी. तुम्हाला वाटेल ते बदलून दाखवून ही हिंमत असेल तर तुम्ही लढणार आहात. स्वतःच्या ताकदीवर निवडून येण्याची क्षमता असली पाहिजे. पण आपली मान दुसऱ्यांच्या खांद्यावर एकत्रित आपण आलं पाहिजे. एका पक्षाचं राज्य येणं शक्य नाही. न घाबरता काम केलं पाहिजे. लोकांच्या प्रश्नांवर बोललं पाहिजे.”