उमाकांत देशपांडे
दुष्काळामुळे पाच हजारांहून अधिक गावांत पाणीटंचाई
राज्यात २०१६ मध्ये पडलेल्या मोठय़ा दुष्काळापेक्षाही यंदा भीषण स्थिती असून पाच हजारांहून अधिक गावांत तब्बल ६२००हून अधिक टँकरद्वारे नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्याची वेळ आली आहे.
गेल्या चार वर्षांत सुमारे २०-२२ हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेची कामे होऊनही सुमारे पाच हजार गावे आणि १० हजार ५०६ वाडय़ांना टँकरद्वारे पाणी पुरवावे लागत आहे. मोसमी पावसाचे आगमन लांबणीवर पडले असून उष्म्याचे चटके तीव्र असल्याने या टँकरची संख्या आणखी वाढणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१४मध्ये राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यावर जलयुक्त शिवार योजनेची घोषणा करण्यात आली आणि पाच वर्षांत राज्य टँकरमुक्त होईल, असे दावे करण्यात आले होते. दरवर्षी पाच हजारांहून अधिक गावांमध्ये या योजनेची कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आणि आतापर्यंत २० ते २२ हजाराहून अधिक गावांमध्ये कामे पूर्ण झाली असून ३० जूनपर्यंत २५ हजारांपर्यंत अधिक गावांमध्ये ही कामे पूर्ण होतील. पण हजारो गावांमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणेही कठीण झाले आहे. परतीचा पाऊस झाला नाही आणि प्रखर उन्हामुळे जलयुक्त शिवार योजनेतील कामांमधील पाणी आटले. तरीही या कामांमुळेच पाणीपुरवठय़ाची स्थिती बरी आहे, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. मात्र या कामांची देखभाल, दुरुस्ती योग्य न झाल्याने पाण्याची गळती, गाळ साठणे आदी प्रश्न निर्माण झाल्याने जलयुक्त शिवार योजनेतील कामे अनेक ठिकाणी कुचकामी ठरत असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.
१० हजारांहून अधिक गुरे चारा छावण्यांत
चारा छावण्यांबाबतही हीच परिस्थिती असून शेतकऱ्यांना चारा-पाण्याची व्यवस्था करणे कठीण असल्याने १० हजारांहून अधिक गुरे त्यामध्ये दाखल करण्यात आली आहेत. गुरांच्या बाजारात किरकोळ किमतींमध्ये गुरे विकली जात असल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची आहे.
खरीप कर्जाचा पेच
गंभीर दुष्काळामुळे नव्याने कर्जमाफी देऊन आगामी खरीप हंगामासाठी तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. महाराष्ट्र बँकेसह अन्य राष्ट्रीयीकृत आणि काही खासगी बँकांचीही पीककर्जाची वसुली ठप्प असून करोडो रुपयांची कर्जे अनुत्पादक (एनपीए) म्हणून वर्ग करण्यात आली आहेत. परिणामी शेतकऱ्यांना खरीप हंगामात नवीन कर्ज देण्याची बँकांची तयारी नाही. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बँकर्स समितीची बैठक होणार आहे.
टँकरची संख्या गतदुष्काळाएवढीच!
२०१६ मध्येही दुष्काळ पडला होता आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होती. तेव्हा ६२०० हून अधिक टँकर पुरवावे लागत होते. याही वर्षी सोमवारी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार सध्या राज्यात ६२०० हून अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.
महिनाभर परवड : मोसमी पावसाचे आगमन ८ जूननंतर होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे आणखी महिनाभर तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर राहणार आहे. त्यामुळे टँकरची संख्या साडेसात ते आठ हजारावर जाण्याची भीती अधिकाऱ्यांना वाटत आहे.
