मुंबई : महानगरपालिकेच्या एच पश्चिम विभागातील पाली हिल जलाशय १ ची जुन्या, जीर्ण झालेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच, वांद्रे पश्चिमेकडील आर. के. पाटकर मार्गावर रामदास नाईक मार्ग ते मार्ग क्रमांक ३२ दरम्यान नव्याने टाकलेल्या ७५० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. संबंधित कामे शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते रात्री १२ दरम्यान करण्यात येणार आहेत. परिणामी, एच पश्चिम विभाग कार्यालयाच्या हद्दीतील काही परिसराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेतर्फे एच पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. याअंतर्गत जीर्ण जलवाहिनी निष्कासित करणे, नवीन मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करणे आदी कामे केली जाणार आहेत. या कामानंतर पाली हिल जलाशयाची पातळी सुधारणार आहे. एकंदरीतच एच पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार आहे. दरम्यान, या दुरूस्तीच्या कामामुळे पेरी परिक्षेत्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, खार दांडा आदी परिसरातील पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> यंदा गणेश विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव; गेल्या ११ वर्षांत कृत्रिम तलावातील गणेशमूर्ती विसर्जनात ३७१ टक्क्यांनी वाढ

संबधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे. तसेच, जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा करण्यात येईल. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> गिरगाव चौपाटीवर ब्लू बॉटल जेलीफिशचा वावर

या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार

पेरी परिक्षेत्र – वांद्रे पश्चिमेकडील काही भाग, वरोडा मार्ग, हिल रोड, मॅन्युअल गोन्सालविस मार्ग, पाली गावठाण, कांतवाडी, शेरली राजन मार्ग (सकाळी १० ते दुपारी २ वाजेदरम्यान पाणीपुरवठा बंद राहील)

खार दांडा परिक्षेत्र – खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुइम गावठाण, खार पश्चिमेकडील काही भाग, गझदरबंध झोपडपट्टीचा काही भाग (सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३० वाजेदरम्यान पाणीपुरवठा बंद राहील)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिक्षेत्र – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गालगतचा परिसर, पेस पाली गावठाण, पाली पठार, खार पश्चिमेकडील काही भाग (रात्री ९ ते १२ वाजेदरम्यान पाणीपुरवठा बंद राहील)