मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये मानसिक आजारांच्या समस्या वाढत आहेत. मात्र देशातील कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्तींमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे एका सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. देशातील उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्तींमध्ये मानसिक समस्यांचे प्रमाण १.७३ पट अधिक असल्याचे आयआयटी जोधपूरने केलेल्या सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे.
हेही वाचा >>> Mental Health Special : सायबर बुलिंगचा मानसिक त्रास कसा होतो?
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जोधपूर (आयआयटी जोधपूर) या संस्थेने नुकतेच भारतातील व्यक्तींमधील मानसिक आजारांबाबत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये देशातील ५ लाख ५५ हजार ११५ व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ग्रामीण भागातील ३ लाख २५ हजार २३२, तर शहरांतील २ लाख २९ हजार २३२ नागरिकांचा समावेश होता. या सर्वेक्षणासाठी ८ हजार ७७ गावांमधील ग्रामस्थांची, तर ६ हजार १८१ शहरांतील नागरिकांची निवड करण्यात आली होती. मानसिक आजारांमुळे त्रस्त असलेल्यांपैकी २८३ रुग्ण बाह्यरुग्ण विभागात, तर ३७४ जण रुग्णालयात उपचार घेत होते. देशामधील कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांच्या तुलनेत जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींमध्ये आरोग्याच्या समस्यांच्या तक्रारींचे प्रमाण १.७३ पट अधिक असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे स्वत:च्या मानसिक आजारांबद्दल व्यक्त होण्याचे प्रमाण १ टक्क्यापेक्षा कमी असल्याचे आढळून आले. मानसिक आजाराबाबत व्यक्त होण्याचे प्रमाण नागरिकांमध्ये कमी असून त्यामुळे नागरिकांना भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. २०१७- १८ मध्ये केलेल्या ७५ व्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या आधारावर हे सर्व्हेक्षण करण्यात आले. २०१७ च्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार भारतात सुमारे १९७.३ दशलक्ष व्यक्तींना मानसिक आजार होता.
हेही वाचा >>> Health Special : खूप वेळ बसून राहण्याने होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
देशातील नागरिकांच्या मानसिक आरोग्यासंदर्भात करण्यात आलेले हे सर्वेक्षण इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेंटल हेल्थ सिस्टीममध्ये प्रकाशित झाले आहे. हे सर्वेक्षण आयआयटी जोधपूरच्या स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. आलोक रंजन आणि अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीतील स्कूल ऑफ हेल्थ अँड रिहॅबिलिटेशन सायन्सेसच्या डॉ. ज्वेल क्रस्टा यांनी संयुक्तपणे केले आहे.
विमा संरक्षण मिळण्याचे प्रमाण अल्प
मानसिक आजारावर उपचार घेण्यासाठी नागरिक सार्वजनिक रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालयात जाणे पसंत करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये मानसिक आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण ६६.१ टक्के आहे. तर सार्वजनिक रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्यांचे प्रमाण ५९.२ इतके आहे. नागरिकांना मानसिक आजाराबाबत विमा संरक्षण मिळण्याचे प्रमाण देशामध्ये फारच कमी आहे. मानसिक विकारांसाठी रुग्णालयात दाखल झालेल्यापैकी केवळ २३ टक्के व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर आरोग्य विमा संरक्षण मिळत असून, हे प्रमाण फारच कमी आहे.
भारतामध्ये मानसिक आजार झालेल्या व्यक्तीकडे एका विचित्र नजरेने पाहिले जाते. मानसिक आजार झाल्याचे इतरांना कळले, तर आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाईल अशी भीती अनेकांना वाटते. म्हणून ते आजाराविषयी बोलतच नाहीत. मानसिक आजार असलेल्या रुग्णांना आधार मिळावा यासाठी समाजात जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.
– डॉ. आलोक रंजन, सहाय्यक प्राध्यापक, स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स विभाग, आयआयटी जोधपूर