मुंबई : पश्चिम रेल्वेने दहिसर आणि बोरिवली स्थानकांदरम्यान पूर्व भागातील सुमारे ८० अनधिकृत झोपड्या हटविल्या. यामुळे परिसरा मोकळा झाला आहे. दरम्यान, रेल्वे मार्गाचा विकास, अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने ही कारवाई केली.
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. कालांतराने काही झोपड्यांचे रुपांतर पक्क्या घरांमध्ये करण्यात आले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला रेल्वे मार्गाचा विस्तार, रेल्वे विभागाचे कार्यालय व इतर बांधकामे करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम रेल्वेचे अभियांत्रिक पथक, रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
बोरिवलीचे रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), रेल्वे पोलीस आणि शहर पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ११० सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात होता. यामध्ये ३३ आरपीएफ अधिकारी, कर्मचारी, ७० रेल्वे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, ३ गृहरक्षक, महाराष्ट्र सुरक्षा दलातील ४ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. याशिवाय, कारवाईदरम्यान पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते.
पश्चिम रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने या कारवाईत महत्त्वपूर्ण योगदान दिले. कामगारांनी अनधिकृत बांधकामे पाडण्यास मदत केली. अनधिकृत बांधकामांमध्ये प्रामुख्याने लोखंडी पत्रे आणि बांबूचा समावेश होता. हे सर्व साहित्य जप्त करून पश्चिम रेल्वेच्या गोदामात पाठवण्यात आले. सार्वजनिक जागेवर होणारे अतिक्रमण रोखणे, या जागांचा सार्वजनिक कामांसाठी सदुपयोग करणे, हा या कारवाईमागील उद्देश आहे, अशी माहिती एका पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्याने दिली.