मुंबई : पश्चिम रेल्वेने १ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळापत्रकात वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या असून १५ डब्यांच्या लोकलचा विस्तार करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने आणखी ३१ वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सामान्य लोकलच्या २३ फेऱ्यांच्या बदल्यात वातानुकूलित लोकल चालवण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा >>> एरंगळ समुद्रकिनाऱ्याजवळील स्मशानभूमी पुन्हा बांधून द्या; उच्च न्यायालयाचे उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

महत्त्वाची बाब म्हणजे प्रवासी क्षमता वाढविण्यासाठी १५ डब्यांच्या लोकलच्या २७ नवीन फेऱ्या सुरू करण्यात येणार असून १२ डबा लोकल गाड्यांना तीन डबे जोडून या फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत येतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबरपासून १२ सामान्य लोकल फेऱ्या चालवण्यात येणार असून सात चर्चगेट दिशेने आणि पाच बोरिवली, विरार दिशेने असतील. १५ डबा लोकलच्या २७ फेऱ्या वाढविण्यात येणार असू त्यामुळे प्रतिदिन १५ डबा लोकलच्या फेऱ्यांची संख्या ७९ वरून १०६ वर पोहोचणार आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.