मुंबई : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा वरळी येथील एनएससीआय डोम येथे सुरू आहे. या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःचे मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे राहिले असता प्रेक्षकांत बसलेल्या काही अज्ञात व्यक्तींकडून ‘बंद करा बंद करा ‘खालिद का शिवाजी’ बंद करा’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तेव्हा तुम्ही तुमचे म्हणणे मांडले आहे, आता कार्यक्रम खराब करू नका, असे सांगून देवेंद्र फडणवीस यांनी मनोगत व्यक्त करण्यास सुरुवात केली. या प्रकरणानंतर संबंधित व्यक्तींना सुरक्षारक्षक घेऊन गेले.
राज मोरे दिग्दर्शित ‘खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट ८ ऑगस्टपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. मात्र या चित्रपटातून खोटा इतिहास सांगितला जात असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यातही पाहायला मिळाले. याप्रसंगी घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तींच्या हातात फलक होते आणि इतिहासाचे विकृतीकरण थांबवा अशी त्यांची मागणी होती.
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा वरळी येथील एनएससीआय डोम येथे सुरू आहे. याप्रसंगी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि मनोरंजनसृष्टीतील कलाकार व मान्यवर उपस्थित आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या हीरक महोत्सवी वाटचालीनिमित्त खास स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रसिद्ध कलाकारांच्या सादरीकरणाने सजलेला ‘रंगतरंग’ कार्यक्रमही सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले होते, तर प्रसाद ओक आणि अमृता सुभाष यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आहे.