मुंबई : अभिनेते अमीर खान यांच्या पुढाकाराने सुरू असलेला सत्यमेव जयते फार्मर कप, हा उपक्रम आता राज्यभरात राबविला जाणार आहे. या बाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला आहे. मंत्रालयात गुरुवारी अमीर खान यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या बैठकीत या उपक्रमाची रुपरेषा निश्चित करण्यात आली. प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादनात वाढ करणे, हा फार्मर कपचा मुख्य उद्देश आहे.
राज्यात २०२२ पासून अमीर खान यांच्या पुढाकारने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते फार्मर कप उपक्रम सुरू आहे. आजवर ५० हजारहून जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. गतवर्षी ४६ तालुक्यांमध्ये फार्मर कपचे आयोजन करण्यात आले होते. पारितोषिक वितरण समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा उपक्रम राज्यभरात राबविण्याचे आवाहन पाणी फाउंडेशनला केले होते. त्यानुसार कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राज्यभर राबविण्याचे नियोजन आहे. या बाबत नुकताच शासन निर्णय काढून १४ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह अमीर खान, सनदी अधिकारी परिमल सिंग, सूरज मांढरे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. आनंद बंग, सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे, किरण राव आणि कृषी संचालक रफिक नाईकवाडी आदींचा समितीत समावेश आहे.
मंत्रालयात गुरुवारी अमीर खान यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीत पाणी फाउंडेशन आणि राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या फार्मर कप उपक्रमाची रुपरेषा निश्चित करण्यात आली. हा कार्यक्रम शेतकरी गटांवर लादला जावू नये. हा सरकारी उपक्रम न राहू नये. स्वयंसेवी संस्थेचा उपक्रमासारखी अंमलबजावणी व्हावी. शेतकरी गट, पाणी फाउंडेशन आणि सरकारची भूमिका निश्चित करण्यात आली. अमीर खान यांची टीम शेतकऱ्यांना प्रशिक्षण देईल. उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादनात वाढ करणे हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असेल. एका महिन्यांनी पुन्हा बैठक होईल, असे ठरविण्यात आले आहे.
उपक्रमाची रुपरेषा निश्चित झाली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार फार्मर कप राज्यभरात राबविण्यात येईल. अमीर खान यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या बैठकीत उपक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली. पाणी फाउंडेशनला कृषी आणि ग्रामविकास विभाग सर्वतोपरी सहकार्य करतील, अशी माहिती कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी दिली.