मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी आणि हिवाळी-२०२५ परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेशाच्या अंतिम तारखेत बदल करण्यात आल्यामुळे मंडळाकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार तंत्र शिक्षण मंडळाकडे विद्यार्थ्यांची नोंदणी व आगामी हिवाळी परीक्षेसाठी १ ते १२ सप्टेंबरपर्यंतच्या वेळापत्रकात बदल करून तंत्रशिक्षण विभागाने ८ ते १९ सप्टेंबर दरम्यान नोंदणी करण्याची मुभा दिली आहे.
तंत्रशिक्षण संस्थांमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीसह सर्व सत्रांतील परीक्षांसाठी नवीन वेळापत्रकानुसार ८ ते १९ सप्टेंबरदरम्यान अर्ज करता येणार आहे. हा अर्ज नियमित परीक्षा शुल्कासह करता येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना या कालावधीत अर्ज करता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना २०० रुपये दंडासह २० ते २३ सप्टेंबरदरम्यान अर्ज करता येणार नाही. त्यानंतर १५०० रुपये दंडासह २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान अर्ज करता येणार आहे. त्याचप्रमाणे विभागीय कार्यालय स्तरावर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी अर्ज व सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज २५ ते २९ सप्टेंबरदरम्यान निश्चित करता येणार आहे.
एआयसीटीई मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाबरोबरच अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठीही हीच पद्धत लागू राहील. मात्र अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज संस्थेमार्फत नोंदणी पूर्ण झाल्यानंतर व विभागीय कार्यालयाने शिस्तबद्धरीत्या निश्चित केल्यानंतरच स्वीकारले जाणार आहेत. प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर सर्व सत्रांतील विद्यार्थ्यांनी मात्र पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा अर्ज भरावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. संस्था प्रमुखांना या परिपत्रकातील सूचनांचे पालन करून निश्चित मुदतीत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश मंडळाने दिले आहेत. विभागीय कार्यालयामार्फत निश्चित झालेले अर्जच हिवाळी परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थी व संस्था यांनी दिलेल्या मुदतीतच प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव उमेश नागदेवे यांनी स्वाक्षरी केलेल्या या परिपत्रकातून करण्यात आले आहे.