मुंबई : परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) देणे बंधनकारक असते. ही परीक्षा जानेवारी २०२६ रोजी होण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जारी केलेले ‘पात्रता प्रमाणपत्र’ आवश्यक असते. या प्रमाणपत्रासाठी आयोगाकडून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून, विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
दरवर्षी अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशी जातात. वैद्यकीय शिक्षणासाठी चीन आणि रशियामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे विद्यार्थी पुन्हा भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी येतात. मात्र पैशाच्या बळावर पदवी घेऊन भारतात येणाऱ्यांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने या विद्यार्थ्यांसाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा बंधनकारक केली आहे. तसेच परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर या पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना भारतामध्ये आंतरवासिता करणे बंधनकारक असते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २० ते २५ टक्के असते. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी साधारणपणे १२००, तर देशात १० हजार विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आंतरवासिता करण्यासाठी येतात. यावर्षी परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भारतात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा जानेवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी आयोगाने जारी केलेले ‘पात्रता प्रमाणपत्र’ आवश्यक असते. या प्रमाणपत्रासाठी आयोगाने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून, ३० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना आयोगाच्या संकेतस्थळावरील https://www.nmc.org.in/ActivitiWebClient/open/studentregistration या लिंकवर अर्ज करता येणार आहे.
पात्रता अर्जाच्या स्थितीबाबत मेलची सुविधा
अर्जदाराने आयोगाकडे पात्रता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर अर्जाच्या स्थितीबाबत जाणून घेण्यासाठी त्यांना eligibility.regn@nmc.org.in आणि eligibility@nmc.org.in या ई-मेलद्वारे चौकशी करता येणार आहे. मात्र यासाठी उमेदवारांना त्यांचा नस्ती क्रमांक (फाईल ट्रॅकिंग क्रमांक) देणे आवश्यक आहे. फाइल ट्रॅकिंग क्रमांकाशिवाय उमेदवाराला कोणताही प्रतिसाद पाठविला जाणार नाही. अर्जदारांच्या मार्गदर्शनासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.
चूका टाळण्यासाठी आयोगाकडून सूचना
पात्रता प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांकडून अनेक चूका होतात. या चूका टाळण्यासाठी आयोगाने विद्यार्थ्यांना काही सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी प्रॉक्सी वापरणे टाळावे, मूळ कागदपत्रांती नोंदी पडताळूनच अर्ज भरावा, सक्रीय असलेला भ्रमणध्वनी क्रमांक द्यावा, जेणेकरून दुरुस्तीसाठी सूचना किंवा उणिवा थेट विद्यार्थ्यांना कळवणे सोपे जाईल आदी सूचनांचा त्यात समावेश आहे.