मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या ॲनाकोंडाची जोरदार चर्चा सुरू आहे. भायखळ्याच्या राणीच्या बागेत ॲनाकोंडा येणार असल्याच्या वृत्ताचा आधार घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना ॲनाकोंडाची उपमा दिली. त्यामुळे सध्या ॲनाकोंडाची उपमा राजकारणात गाजते आहे. पण मुंबईकरांना राणीच्याबागेत ॲनाकोंडा बघायला कधी मिळणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.

भायखळ्याच्या वीरमाता जिजामाता भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) सर्पालय उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत सर्पालय उभारण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. राणीच्या बागेच्या नूतनीकरणाचा प्रकल्प सध्या मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत विविध प्राणी व पक्षांसाठी नैसर्गिक अधिवास तयार केले जात आहेत. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून जिजामाता उद्यानात सर्पालयही साकारण्यात येणार आहे.

जुने सर्पालय तोडून १६,८०० चौरस फूट जागेत नव्याने सर्पालय बांधण्यात येणार असून गेल्या तीन चार वर्षात राणीच्या बागेत कोणताही नवीन प्राणी आलेला नाही. त्यामुळे सर्पालय तयार झाल्यास पर्यटकांना नवीन प्राणी पाहता येणार आहेत. या सर्पालयात देशी विदेशी प्रकारचे असे १६ प्रकारचे साप पर्यटकांना पाहता येणार आहेत. या ठिकाणी घोणस, मण्यार, फुरसे असे देशी साप पाहता येतील. तसेच रेड सॅड, रॉक पायथॉन असे विदेशी साप आणि त्याबरोबरच ॲनाकोंडा हा सापही पाहता येईल.

सर्पालयासाठी निविदा काढण्यात येतील त्यानंतर बांधकाम होईल मग कोणते प्राणी मिळतील याची चाचपणी होईल. ॲनाकोंडा आणण्यासाठी त्या बदल्यात दुसरा प्राणी द्यावा लागणार आहे. त्यामुळे त्याबाबत अन्य प्राणी संग्रहालयांशी चर्चा करण्यात येईल. या सगळ्या प्रकियेला किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल अशी माहिती प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.