विहिरी गेल्या कुठे?कुर्ल्यातील ८४ विहिरी गायब, पालिकेच्या दफ्तरी नोंद नाही

गेल्या चार-पाच दशकांमध्ये मुंबईत पुनर्विकासाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत.

कुर्ल्यातील ८४ विहिरी गायब; पालिकेच्या दफ्तरी नोंद नाही

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमधील कुर्ला परिसरातील तब्बल ८४ विहिरी गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या विहिरी नेमक्या कोणत्या कारणामुळे गायब झाल्या याची माहितीही पालिकेच्या दफ्तरी नाही. मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विहिरींचे संवर्धन करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाचा सत्ताधारी शिवसेनेलाही विसर पडल्याचे या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे.

ब्रिटिश भारतातून निघून गेल्यानंतर मुंबई विस्तारली. पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक ठिकाणी खासगी भूखंडावर विहिरी बांधण्यात आल्या. पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी या पाण्याचा वापर होत होता. मुंबई महापालिकेचे जल वितरणाचे जाणे बळकट झाल्यानंतर हळूहळू या विहिरींचा संबंधितांना विसर पडू लागला. विहिरींच्या साफसफाईकडेही दुर्लक्ष होऊ लागले. मुंबईमध्ये २००९ मध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यावेळी विहिरींचे संवर्धन करण्याची घोषणा त्यावेळचे सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि पालिका प्रशासनाने केली होती. त्यावेळी विहिरींची साफसफाई करून त्यातील पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी उपलब्ध करण्याचा पालिकेचा मानस होता. मात्र काही काळानंतर या घोषणेचा पालिकेलाही विसर पडला.

गेल्या चार-पाच दशकांमध्ये मुंबईत पुनर्विकासाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. अनेक जुन्या चाळींची जागा टोलेजंग इमारतींनी घेतली आहे. कुर्ला परिसरातही मोठ्या प्रमाणावर इमारतींचा पुनर्विकास होत आहे. पुनर्विकासाआड येणाऱ्या विहिरी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या ‘एल’ विभाग कार्यालयाच्या अखत्यारित येत असलेल्या कुर्ला आणि आसपासच्या परिसरातील ८४ विहिरी गायब झाल्या अथवा बुजविण्यात आल्याची खळबळजनक माहिती पालिकेच्या माहितीचा अधिकार कार्यकर्ते सागर उगले यांनी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत केलेल्या अर्जाच्या उत्तरात कीटक नियंत्रण विभागाने सादर केली आहे. सात विंधन विहिरींचा त्यात समावेश आहे. यामध्ये खासगी मालकीच्या ४३, सरकारी ३८ आणि पालिकेच्या तीन विहिरींचा समावेश आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे कुर्ला परिसरातील पुनरुज्जीवित केलेल्या विहिरींची माहितीही सादर करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र याबाबत पालिका दफ्तरी माहिती नसल्याचे कीटक नियंत्रण विभागाच्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

विहिर संवर्धनाच्या आश्वासनाचा विसर

गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वचननाम्यात शिवसेनेने विहिरींचे संवर्धन करण्याचे आश्वासन दिले होते. मुंबईत झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे. मुंबईत अनेक विहिरी आहेत. यातील अनेक विहिरींची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अशा विहिरींची योग्य ती निगा राखून विहिरींतील पाण्याचा वापर दैनंदिन दुय्यम कामांसाठी करण्यात येईल, असे शिवसेनेने वचनाम्यात म्हटले होते. येत्या फेब्रुवारीमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीच्या तोंडावर गायब झालेल्या विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आला असून या प्रश्नावरून शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Where the wells last the well disappeared there is no official record of the municipality akp

ताज्या बातम्या