गुटखा व्यापारी जेएम जोशीला मुंबई विशेष न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. कुख्यात गँगस्टर, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मदत केली असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. दाऊदच्या मदतीनेच त्याने २००२ साली पाकिस्तानात गुटख्याचा उद्योग उभारला होता. याच प्रकरणात मुंबई विशेष न्यायालयाने त्याला आरोपी म्हणून जाहीर केले आहे. जोशीच्या सोबतच जमीरुद्दीन अंसारी आणि फारुख अंसारी यांना देखील आरोपी म्हणून जाहीर करत त्यांनांही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कोण आहे जेएम जोशी? माणिकचंदशी होता संबंध

याच प्रकरणात माणिकचंद ग्रुपचे संस्थापक रसिकलाल धारीवाल यांच्यावर देखील आरोप झाले होते. मात्र २०१७ साली त्यांचे निधन झाल्यानंतर या आरोपांतून त्यांना बाजूला केले गेले. या प्रकरणापुरते बोलायचे झाल्यास धारीवाल आणि जेएम जोशी याआधी एकत्रच गुटख्याचा व्यापार करत होते. मात्र पैशांच्या व्यवहारावरुन त्यांच्यात मतभेद झाले आणि दोघांनीही वेगळा मार्ग निवडला. धारीवाल यांच्यापासून फारकत घेत जोशीने गोवा गुटखा नावाची दुसरी कंपनी उघडली होती. मात्र दोघांमधील व्यावसायिक युद्ध संपवावे यासाठी थेट पाकिस्तानातून दाऊदने हस्तक्षेप केला होता. याच्या बदल्यात दाऊद पाकिस्तानात गुटख्याचा कारखाना टाकायला मदत करेल, अशी ऑफर दाऊदकडून देण्यात आली. ही मदतच आता जेएम जोशीला जेलची हवा खाण्यास कारणीभूत ठरली आहे. मकोका कायद्याच्या अंतर्गत जोशीवर आरोप निश्चित झाले आहेत.

दाऊदशी संबंध कसे निघाले

जेएम जोशी याच्यावर पाकिस्तानात गुटखा कारखाना टाकल्याचा आरोप आहेच. त्याशिवाय त्याने २.६४ लाखांची मशीन पाकिस्तानात पाठविली होती. याच्यासोबतच या व्यवसायातील एका तज्ज्ञाला बळजबरीने पाकिस्तानात पाठवून त्यांच्याकडून कारखान्याची सुरुवात करुन घेतली होती. एवढंच नाही तर जोशी त्यावेळी या कारखान्याचे उदघाटन करायला पाकिस्तानात देखील गेला होता, असा आरोप करण्यात आलेला आहे. दाऊदला केलेली ही मदत जोशीच्या अंगलट आली असून त्याच्यावर मकोका सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहआरोपी मुंबई बॉम्बस्फोट कटात होते सामील

विशेष म्हणजे या प्रकरणातील सहआरोपी जमीरुद्दीन अंसारी आणि फारुख अंसारी या दोघांनी १९९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जोशीच्या वकिलाने कोर्टात प्रतिवाद करताना सांगितले की, त्यांच्या कंपनीद्वारे भारतात लाखो लोकांना रोजगार देण्यात आला आहे. तसेच सरकारला देखील मोठ्या प्रमाणात कर देण्यात आला आहे. तरिही या प्रकरणाची गंभीरता आणि दाऊदशी संबंध पाहता त्यांना कोर्टाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली आणि पाच लाखांचा दंड ठोठावला.