Who is NV Modak : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबई शहराच्या नियोजनाचा (टाऊन प्लॅनिंग) मुद्दा उपस्थित केला. मुंबई शहराची लोकसंख्या पाहता शहरातील वाहतुकीची समस्या कशी सोडवता येईल, पाण्याची समस्या कशी सोडवता येईल आणि पर्जन्यव्यवस्थापनाबाबत काही महत्त्वाच्या बाबी त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना देखील काही सल्ले दिले. दरम्यान, शहर नियोजन कसं असावं याबद्दल सांगताना राज ठाकरे म्हणाले, “अभियंते नानासाहेब मोडक यांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे. माहिम, दादर, वडाळा, हिंदू कॉलनी, नायगाव व परळ या भागाचं टाऊन प्लॅनिंग मोडक यांनीच केलं होतं. मोडकसागर धरण व जलाशयाला त्यांचंच नाव दिलं आहे.”
राज ठाकरे यांनी उल्लेख केलेल्या नानासाहेब मोडक यांच्याबद्दल इंटरनेटवर पुरेशी माहिती उपलब्ध नाही. मात्र, मुंबई शहराच्या जडणघडणीत त्यांचं मोठं योगदान आहे. क्वीन्स नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्हची उभारणी देखील त्यांनीच केली आहे. भारतावर ब्रिटिशांचं राज्य असताना अभियंते नानासाहेब मोडक हे मुंबई महापालिकेत स्पेशल कॉर्पोरेशन इंजिनिअर आणि मुंबई शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे मुख्य अभियंते होते. त्यांनीच मध्य मुंबईचं टाऊन प्लॅनिंग केलं होतं. या भागात पिण्याचं पाणी पोहोचवण्याचं काम त्यांनीच केलं होतं.
मुंबईच्या विकासात महत्त्वाचं योगदान
नानासाहेब मोडक हे एक जागतिक दर्जाचे वास्तुशास्त्रज्ञ आणि नगररचना तज्ज्ञ होते. दादरमधील सेनापती बापट यांच्या पुतळ्याच्या मागे त्यांचं घर आहे. नानासाहेबांनी मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर धरण बांधण्याची योजना मांडली आणि पूर्ण केली. त्यांच्या कामाचा गौरव म्हणून या धरणाला मोडकसागर असं नाव देण्यात आलं. हे धरण १९५६ मध्ये बांधण्यात आलं आणि १९५७ पासून या धरणातून मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली.
नरीमन पॉइंट ते गिरगाव चौपाटीपर्यंत इंग्रजीमधील सी (C) अक्षराच्या आकारात पसरलेल्या किनाऱ्यावर उभारलेल्या मरीन ड्राईव्हची उभारणी देखील नानासाहेब मोडक यांनीच केली आहे. अमेरिकन टाऊन प्लॅनर अल्बर्ट मेयर यांच्याबरोबर मोडक यांनी ‘अॅन आउटलाइन ऑफ दी मास्टर प्लॅन फॉर ग्रेटर बॉम्बे (१९४८)’ हा महत्त्वाचा अहवाल तयार केला. पुढे अनेक दशकं शहरातील विकासकामं करताना हा अहवाल वापरण्यात आला.