लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: गेल्या एका वर्षात भू-राजकीय आघाडीवरील घडामोडी आणि ट्रम्प यांच्या व्यापार शुल्कामुळे बाजाराने गती गमावली आहे. त्यातच कंपन्यांचा माफक कमाईचा हंगाम आणि परकीय गुंतवणूकदारांचे निरंतर बाहेर पडणे यामुळे निर्देशांक एका श्रेणीत फिरत राहिले आहेत. या वातावरणात, मिश्र बाजार भांडवलावर आधारीत गुंतवणूक करणाऱ्या ‘फ्लेक्सीकॅप’ म्युच्युअल फंडांची कामगिरी तुलनेने उजवी राहिली.
म्युच्युअल फंडाच्या प्रत्येक श्रेणीचे स्वतःचे फायदे आणि वैशिष्ट्ये आहेत. तथापि, स्थिर कामगिरी आणि वाजवी उत्पन्न देण्याची क्षमता लक्षात घेता, गुंतवणूकदारांना डिव्हिडंड यील्ड अर्थात लाभांश उत्पन्न देणाऱ्या कंपन्यांना विचारात घेता येईल. या श्रेणीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल डिव्हिडंड यील्ड इक्विटी फंडाचे नाव एकंदर कामगिरी पाहता प्राधान्याने घेता येऊ शकेल.
सेबीच्या म्युच्युअल फंडांच्या वर्गीकरणानुसार, डिव्हिडंड यिल्ड फंड हे प्रामुख्याने उच्च लाभांश उत्पन्न असलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतात. त्यांच्या पोर्टफोलिओत अशा ६५ टक्के कंपन्यांचा समावेश बंधनकारक आहे. तथापि, अशा कंपन्यांचा दीर्घकाळात भांडवल वाढीची कामगिरी यथातथाच असते. मात्र व्यापक बाजार प्रवाहाच्या तुलनेत आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या योजनेचा भर या श्रेणीतील इतरांपेक्षा खासच वेगळा आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल डिव्हिडंड यील्ड इक्विटी फंड हा या श्रेणीतील अव्वल कामगिरी राहिलेला फंड असून, त्याने त्याच्या मानदंड निर्देशांक असलेल्या निफ्टी ५०० टीआरआय तसेच श्रेणीतील इतर योजनांना परताव्यात लक्षणीय फरकाने मागे टाकले आहे. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी, एक, तीन, पाच आणि १० वर्षांच्या कालावधीत, फंडाने त्याच्या बेंचमार्कपेक्षा ३ ते ९ टक्के अधिक आणि श्रेणीच्या सरासरीपेक्षा २ ते ६ टक्के अधिक परताव्यात सातत्य राखले आहे. मे २०१४ पासून कार्यरत फंडाने, वार्षिक सरासरी १८.७ टक्के दराने गुंतवणुकीवर परतावा दिला आहे. सुरुवातीपासून फंडातील १०,००० रुपयांच्या मासिक ‘एसआयपी’ गुंतवणुकीचे मूल्य ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ४१.३ लाख रुपये झाले असते.