मुंबई : वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार यांना मनी लॉंड्रींग प्रकरणात केलेल्या अटकेबाबत सक्तवसुली संचलनालायने (ईडी) सात दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबर रोजी होणार आहे.
वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ४१ अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात मनी लाँड्रिंगअंतर्गत अटक केली आहे. त्यांच्यासोबत पालिकेचे तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी, माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्यांचा पुतण्या अरुण गुप्ता यांनाही अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी १३ ऑगस्ट पासून तुरूंगात आहेत.
अटकेला अनिलकुमार पवारांचे आव्हान
अनिलकुमार पवार यांनी त्यांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ही अटक बेकायदेशीर असून अधिकाराचा गैरवापर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या अटकेविरोधात ॲड. उज्ज्वल चव्हाण यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही अटक बेकायदेशीर, पक्षपाती आणि कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पवार यांना अडकवण्यासाठी निवडक गुन्ह्यांसाठी वेगवेगळे कथानक रचण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पवार यांच्या घरात केलेल्या झडतींमध्ये कोणतीही रोख रक्कम, दागिने किंवा मालमत्तेचे दस्तावेज सापडले नव्हते. काही नातेवाईकांकडून रोकड मिळाली होती. ती त्या नातेवाईकांचीच होती. पवार यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावे नसताना अटक करण्यात आली, असे याचिकेत म्हटले आहे. अवाजवी मालमत्ता तपासण्याचा अधिकार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला आहे, ईडीला नाही, याकडेही याचिकेत लक्ष वेधले आहे.
सात दिवसांत भूमिका स्पष्ट कराया प्रकरणाची सुनावणी गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात झाली. यावेळी अनिलकुमार पवार यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल उच्च न्यायालयाने घेतली. या अटकेला देण्यात आलेले आव्हान आणि आरोपांबाबत सक्तवसुली संचलनालायने एक आठवड्यात आपली भूमिका स्पष्ट करावी, असे न्यायालयाने सांगितले. या याचिकेवरील पुढील सुनावणी ३० सप्टेंबर रोजी होणार आहे.
सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
बांधकाम घोटाळ्यात माजी आयुक्त अनिलकुमार पवार, तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी, भूमाफिया सिताराम गुप्ता, अरूण गुप्ता यांच्या न्यायलयीन कोठडीची मुदत बुधवारी संपली. मात्र त्यांना जामीन मिळाला नाही. त्यांच्या न्यायलयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली. हे आरोपी १३ ऑगस्टपासून अटकेत आहेत. दरम्यान, ईडीने वाय. एस. रेड्डी यांची पुन्हा सहा दिवसांची कोठडी घेतली होती. तपास झाल्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.