मुंबई : मित्राचे इन्स्टाग्राम खाते हॅक करून कूटचलनामध्ये (क्रिप्टो करन्सी) गुंतवणुकीचा संदेश पाठवून जुहूतील ३६ वर्षीय फॅशन डिझायनर महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तक्रारदार महिलेने आरोपीला तिचे पैसे परत करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने तिचे इन्स्टाग्राम खातेही हॅक केले. अखेर तिने याप्रकरणी जुहू पोलिसांकडे तक्रार केली.

तक्रारदार महिलेला २९ एप्रिलला तिच्या मित्राच्या इन्स्टाग्राम खात्यावरून एक संदेश आला होता. त्याने कूटचलनामध्ये ५० हजार रुपये गुंतवले आहेत आणि त्यातून चार लाख ९० हजार रुपयांचा नफा कमावल्याचे संदेशात म्हटले होते. तसेच तक्रारदार महिलेलाही कूट चलनामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. यावेळी संदेशात बिनान्स मोबाइल अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले होते. तिने संदेशात दिलेल्या सूचनांचे पालन केले. यावेळी ३० हजार रुपये गुंतवणूक करण्याची सूचना करणारी लिंक तक्रारदार महिलेला पाठवण्यात आली. नोंदणीकरण केल्यानंतर त्यांना साडेपाच हजार रुपयांचा नफा झाला असून तो मिळवण्यासाठी प्रथम ८० हजार रुपये भरण्यास सांगण्यास आले. हे पैसे भरल्यानंतरही तिला कोणतीही रक्कम मिळाली नाही.  

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने ई-मेलमध्ये मिळालेल्या संपर्क क्रमांकावरून त्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिची ओळख पडताळणी झाल्यानंतर पैसे परत मिळतील, असे फसवणूक करणाऱ्याने तिला सांगितले. त्यानंतर त्याने तिला तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर जाऊन एडिट प्रोफाइलवर क्लिक करण्यास सांगितले. महिलेने एडिट प्रोफाइलवर क्लिक केले. त्यानंतर त्याने तिला नवीन ई-मेल आयडीसह ई-मेल आयडी बदलण्यास सांगितले आणि तिला तिचा मोबाइल नंबर टाकण्यास सांगितले. असे केल्यानंतर फसवणूक करणाऱ्याने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर नियंत्रण मिळवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर लगेचच त्याने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरील नाव बदलले. काही वेळाने तिला तिच्या मित्राचा दूरध्वनी आला. त्याने आपले इन्स्टाग्राम खाते हॅक झाले असून त्याने नवीन इन्स्टाग्राम खाते उघडले असल्याचे सांगितले. त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगून आरोपीने तिचेही इन्स्टाग्राम खाते हॅक केल्याचे सांगितले. या प्रकारानंतर तिने जुहू पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.