मुंबईः वरळी सी फेस येथे भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरगाडीने दिलेल्या धडकेत ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. महिला रविवारी पहाटे वरळी सीफेस येथे चालण्यासाठी आली होती. या अपघातात गाडीचा चालकही जखमी झाला आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून २३ वर्षीय चालकाला अटक केली आहे.
राजलक्ष्मी राजकृष्णन असे महिलेचे नाव आहे. वरळी डेअरीजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास ही महिला चालत होती. त्यावेळी तेथे भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरगाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामळे मोटरगाडी या महिलेला धडकली. त्यानंतर गाडी तेथील दुभाजकालाही धडकली. मोटरगाडी महिलेला मागून धडकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महिला दूरवर फेकली गेली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने तिला नायर रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून महिलेला मृत घोषित केले. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
आणखी वाचा- मुंबईकडून बेंगलोरच्या दिशेने जाणार्या खासगी बसला बावधन येथे अपघात, पाच प्रवासी जखमी
याप्रकरणी चालकाविरोधात बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सुमेर मर्चंट (२३) असे आरोपी चालकाचे नाव असून तो ताडदेव येथील रहिवासी आहे. त्यालाही अपघातात दुखापत झाली आहे. एका मैत्रीणीला सोडण्यासाठी तो गेला होता. मैत्रीणीला सोडून येताना हा अपघात झाला. त्याला वरळी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने दारूचे सेवन केले होते का ते तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
वरळी सी-फेस परिसरात किनारी मार्गाचे काम सुरू असल्यामुळे तेथे चालण्यासाठी येणाऱ्यांना जागा अपूरी पडते. त्यामुळे अनेकांना समोरील पदथावर व रस्त्यावर जीव मुठीत घेऊन चालावे लागते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.