आरे वसाहतीतील चाफ्याच्या पाडय़ावरील थरार
पोटच्या गोळ्याला नरभक्षक बिबटय़ा आपल्या डोळ्यांदेखत ओढून नेतोय.. हे दृष्य कोणाच्याही जिवाचा थरकाप उडवणारे.. मात्र, अशाही परिस्थितीत प्रसंगावधान राखून थेट त्या जंगली श्वापदाच्या अंगावरच झडप घालण्याचे साहस दाखवणे हे दृष्य विरळाच.. आरे वसाहतीतील चाफ्याच्या पाडय़ावरील एका मातेने हे अचाट साहस करून आपल्या चिमुरडय़ाला अक्षरश मृत्यूच्या दाढेतून ओढून आणले.
ही घटना सोमवार रात्रीची. चाफ्याच्या पाडय़ावरील प्रमिला रिंजाड (२८) रात्री नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर पडल्या. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा तीन वर्षांचा चिमुरडा प्रणयही चालू लागला. मात्र, प्रमिला यांना त्याची पुसटशीही कल्पना नव्हती. घरापासून काही अंतरावर असलेल्या जंगलाच्या झाडाझुडपांत प्रमिला शिरल्या. तसा प्रणयही त्यांच्या मागे गेला. मात्र, अंधारात दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने प्रणय त्याच्या टप्प्यात येताच त्याच्या अंगावर झडप घातली. आपल्या विशाल जबडय़ात पकडून बिबटय़ा प्रणयला जंगलात ओढून नेऊ लागल्या. प्रणयच्या ओरडण्याने सावध झालेल्या प्रमिला यांना झाला प्रकार लक्षात आला. पोटच्या गोळ्याला बिबटय़ा ओढून नेत आहे, हे पाहताच प्रमिला यांनी प्रथमत मदतीसाठी आरडाओरड केली. परंतु लगेचच मदत मिळणे अशक्य असल्याचे लक्षात येताच त्या शूर मातेने थेट बिबटय़ाच्या अंगावरच झडप घातली. या प्रकाराने बिबटय़ाही भांबावला. त्याने तोंडातली ‘शिकार’ तशीच टाकून जंगलाकडे धूम ठोकली आणि प्रमिला यांनी सुटकेचा निश्वास टाकला. परंतु जराही उसंत न घेता त्यांनी जखमी प्रणयला उचलून पाडय़ावर आणले. प्रमिला यांच्या आरडाओरडय़ाने पाडय़ालाही जाग आली होती. जखमी प्रणयला प्रथम आरे रुग्णालयात व नंतर पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बिबटय़ाच्या दातांमुळे प्रणयच्या पाठीवर जखमा झाल्या असून त्याच्या गुडघ्यालाही मार बसला आहे. परंतु त्याच्यावर उपचार करून नंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय औलकर यांनी दिली. दरम्यान, प्रमिला यांच्या साहसाची चर्चा आदिवासी पाडय़ावर चांगलीच रंगली होती.