मुंबई : मध्य रेल्वेवरील पुणे-मुंबई उद्यान एक्स्प्रेसमध्ये महिलेचा विनयभंग करून तिच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने खेचून, तिला एक्स्प्रेसमधून ढकलून देण्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. याप्रकरणी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी मनोज चौधरी (३२) याला अटक केली आहे.
पीडित महिला रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पुण्यावरून उद्यान एक्स्प्रेसने सीएसएमटीला येत होती. यावेळी ती एक्स्प्रेसच्या गार्ड बाजूकडील महिलांच्या सामान्य डब्यात बसली होती. गाडी रात्री ८.२७ वाजेच्या सुमारास दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ६ वर आली. गाडीतील सामान्य महिला डब्यातील सर्व महिला उतरल्यानंतर पीडित महिला एकटीच डब्यात असल्याचे पाहून आरोपी डब्यात चढला. त्यानंतर महिलेचा विनयभंग करून तिच्या जवळील बॅग जबरीने खेचून रोख रक्कम काढून घेतली. यावेळी संबंधित महिलेने त्याचा प्रतिकार केला. मात्र झटापटीत चोरटय़ाने धावत्या एक्सप्रेसमधून त्या महिलेला ढकलून दिले. यात ती फलाटावर पडल्याने जखमी झाली. या महिलेने सोमवारी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विनयभंग, जबरदस्तीने चोरी केल्याचा गुन्हा नोंदवून मूळचा मध्य प्रदेशचा असलेल्या आरोपी मनोज चौधरीला अटक केली.
आरोपी अटकेत..
दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी या गुन्हयातील जखमी महिलेची चौकशी केली. त्यानंतर दादर रेल्वे स्थानक व सीएसएमटी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून संशयित आरोपीला गुन्हा दाखल होण्याआधीच ताब्यात घेतले. त्यानंतर सोमवारी संबंधित महिलेने तक्रार केल्यानंतर आरोपी मनोज चौधरीवर गुन्हे दाखल करून अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दादर रेल्वे पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.