मुंबई : सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या एका महिलेने कर्मचाऱ्याचे लक्ष नसताना सोन्याची एक अंगठी गायब केली. कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मॉलमध्ये सोने आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. यापैकी एका दुकानात मंगळवारी सदर महिला सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आली होती. यावेळी तिच्यासोबत एक व्यक्ती होता. दुकानातील महिला कर्मचाऱ्याने या महिलेला काही सोन्याचे दागिने दाखवले. मात्र तिने एकही दागिना खरेदी केला नाही. त्यानंतर तिने सोन्याच्या अंगठ्या दाखवण्यास सांगितले. याच वेळी बारकोड नसल्याने एका अंगठीची किंमत पाहण्यासाठी महिला कर्मचारी मागे वळली.
याच वेळी सदर महिलेने ही अंगठी तिच्या पर्समध्ये टाकली. सायंकाळी दागिन्यांची मोजणी सुरू असताना एक अंगठी कमी आल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासले. यावेळी याच महिलेने ही अंगठी चोरल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत.