मुंबई : बांगलादेशातून ३० वर्षांपूर्वी बेकायदेशिररित्या भारतात येऊन राहणाऱ्या महिलेला सहार पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली. आरोपी महिलेने भारतीय पारपत्र तयार केले असून त्यावर परदेशातही प्रवास केल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे. आरोपी महिलेने सहा वर्षे कुवेत देशात नोकरी केली आहे. तिने भारतीय व्यक्तीशी लग्न करून त्याच्या नावाने बनावट कागदपत्र तयार करून पारपत्र मिळवल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करत आहेत.
मारिया खातून मोहम्मद मन्सुर अली असे या महिलेचे नाव अल्याची माहिती पोलिसांनी दिली. तक्रारदार समीर गैबू पठाण हे इमिग्रेशन अधिकारी असून कुर्ला परिसरात राहतात. ते रविवारी रात्री विदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या कागदपत्रांची पाहणी करत होते. रात्री अडीच वाजता कुवेतहून मुंबईतील आंतराराष्ट्रीय विमानतळावर आरोपी महिला आली होती. तिच्याबाबत संशय आल्याने तिला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. कागदपत्रांच्या तपासणीत ती बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगितले. ती १५ वर्षांची असताना बांगलादेशातील उपासमारी आणि गरीबीला कंटाळून भारतात पळून आली होती. असे तिच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. तेव्हापासून मारिया खातून भारतात राहत होती. त्यांतर १९९२ मध्ये तिने अरविंद कुमार हिरालाल नावाच्या भारतीय व्यक्तीशी लग्न केले. त्यानंतर त्याच्या नावाच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून आरोपी महिलेने स्वतःच्या नावाचे भारतीय नागरिक असल्याचे बनावट कागदपत्र बनवले. या कागदपत्रांद्वारे तिने आधारकार्ड व पॅनकार्ड सारखी कागदपत्रे मिळवली. त्याआधारे तिने २०१६ मध्ये भारतीय पारपत्र मिळवले. त्यावर ती कुवेतला नोकरीसाठी गेली होती. गेल्या सहा वर्षांपासून ती कुवेतमध्ये नोकरी करत होती. दरम्यान दोनदा तिने आपले पारपत्राचे नूतनीकरण केले आहे, अशी माहिती तिच्या चौकशीतून उघड झाली आहे.
३३ वर्षानंतर खोटेपणा उघड
१९९२ मध्ये भारतात आल्यानंतर तेव्हापासून मारिया खातून भारतीय यंत्रणा व पोलिसांपासून लपून होती. सहा वर्ष कुवेतमध्ये राहत होती. नुकतीत ती कुवेतमधून परतली असताना तिच्यावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांना संशय आला. तिच्याकडे बांगलादेशी जन्मप्रमाणपत्र सापडले. त्यामुळे बांगलादेशी नागरिक असल्याेच निष्पन्न झाल्यानंतर तिला पुढील तपासासाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर सहार पोलिसांनी याप्रकरणी पारपत्र व विदेशी व्यक्ती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर तिला याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपी महिलेविरोधात बनावट कागदपत्र तयार करणे व त्याचा वापर केल्याचाही आरोप आहे. आरोपी महिला बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील रहिवासी आहे. याप्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करत आहेत.