मुंबई : राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेल्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियानाचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यात मंत्रालय स्तरावर माहिती व बालविकास विभाग सर्वोत्तम ठरला असून पहिल्या चारमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या मंत्र्यांचीच खाती आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडील काही विभाग तळातच राहिले आहेत.
फडणवीस यांनी प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी १०० दिवसांच्या कृती आराखडा अभियानाची घोषणा केली. मंत्रालयातील सर्व ४८ विभागांना तसेच महापालिका, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदांसाठी लोकहिताच्या योजना, उपक्रमांची अंमलबाजवणी करण्याबाबतच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले होते. भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत विभागाचे संकेतस्थळ, कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले.
विभागनिहाय आढाव्यात राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडील महिला व बालकल्याण विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी अशी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ राबविण्याची जबाबदारी या खात्याकडे आहे. भाजपचे शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषि, भाजपचे जयकुमार गोरे यांच्याकडील ग्रामविकास खात्याचा क्रमांक लागला आहे. पहिल्या पाच विभागांमध्ये शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्याकडील परिवहन हे एकमेव विभाग आहे.
या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करतानाच या विभागांनी भविष्यातही अशीच चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. चंद्रपूर, ठाणे, पुणे, पालघर, गोंदिया, नांदेड, कोल्हापूर, अकोला या जिल्ह्यांतील कार्यालयांनी लक्षणीय गुण मिळविले आहेत. तर गृहनिर्माण, सामान्य प्रशासन, नगरविकास, आदिवासी या विभागांनी जाहीर केलेल्या मुद्यांपैकी अजूनही काही मुद्दे प्रलंबित असून काहींनी ऑगस्ट तर काहींनी १५ डिसेंबरपर्यंत पूर्ततेची ग्वाही दिली आहे.
लक्षणीय कामगिरी
●विभाग – महिला व बालविकास (८० टक्के)
●जिल्हाधिकारी – चंद्रपूर (८४.२९ टक्के)
●महापालिका आयुक्त – उल्हासनगर (८६.२९ टक्के)
●जिल्हा परिषद – ठाणे (९२ टक्के)
●पोलीस आयुक्त – मीरा भाईंदर (८४.५७ टक्के)
पहिल्या १०० दिवसांत सर्व विभागांनी निश्चित केलेल्या ९०२ धोरणात्मक उद्दिष्टांपैकी ७०६ उद्दिष्टे (७८ टक्के) पूर्णत: साध्य केली आहेत. उर्वरित १९६ उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत विभागांनी आपले काम चालूच ठेवावे. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री