नगरसेविका शीतल म्हात्रे यांना त्रास दिल्याच्या आरोपावरून अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊनही शिवसेनेचे विभागप्रमुख विनोद घोसाळकर यांना अटक होत नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि समाजवादी पार्टीच्या नगरसेविकांनी घोषणाबाजी आणि शिट्टय़ा फुंकून पालिका सभागृहात गदारोळ केला. अखेर महापौर सुनील प्रभू यांनी शिट्टय़ा फुंकणाऱ्या तीन नगरसेविका आणि दोन नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित करीत पालिका सभागृह तहकूब केले.
बेस्टच्या २०१४-१५ च्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी सभागृहाची विशेष सभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. ‘असुरक्षित नगरसेविका’ प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी निवेदन करण्याची मागणी महापौरांकडे केली. परवानगी मिळताच सभागृहात पाठीमागून निवेदन करणाऱ्या आंबेरकर यांना महापौरांनी रोखले आणि आपल्या आसनावर येऊन निवेदन करण्याची सूचना केली. मात्र महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर होणाऱ्या चर्चेसाठी नगरसेविकांना पुढे बसण्याचा मान आपण दिल्याचे सांगत आंबेरकर यांनी निवेदन सुरू केले. मात्र महापौर वारंवार त्यांना आसनावर येण्याचे आदेश देत होते. यामुळे अन्य विरोधी नगरसेविका खवळल्या. ‘दादागिरी नही चलेगी’, ‘महापौर हाय हाय’, ‘घोसाळकरांना अटक झालीच पाहिजे’, ‘शीतल म्हात्रे यांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा देत शिट्टय़ा फुंकत त्यांनी सभागृह दणाणून सोडले.
सभागृहात शिट्टय़ा वाजवू नका, शिट्टय़ा पटलावर जमा करा, असे आदेश महापौर वारंवार देत होते. अखेर सुनील प्रभू यांनी शिट्टी वाजविणाऱ्या नगरसेविका वकारुन्नीसा अन्सारी, नूरजहा रफिक, पारुल मेहता, मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक प्रवीण छेडा यांना एक दिवसासाठी निलंबित केले. निलंबित केलेल्या नगरसेवकांनी तात्काळ सभागृहाबाहेर जाण्याचेही आदेश त्यांनी दिले. परंतु विरोधकांनी प्रचंड गदारोळ केल्यामुळे अखेर महापौरांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. विरोधकांनी महापौरांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी त्यांना ‘क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले’ हे पुस्तक भेट म्हणून दिले.
दरम्यान, विरोधकांनी सभागृहाच्या प्रथा परंपरांचा भंग केला आहे. मात्र येत्या शुक्रवारी विरोधकांनी कितीही गोंधळ घातला पालिका सभागृहाची बैठक तहकूब करणार नाही, असा निर्धार महापौर सुनील प्रभू यांनी व्यक्त केला. एकीकडे असुरक्षित नगरसेविकांप्रकरणी विनोद घोसाळकर यांच्याबाबत शिवसेना पक्षप्रमुखांनी मौन बाळगले असताना महापौरांनी मात्र शीतल म्हात्रे प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा पक्का निर्धार केला आहे.
सुरक्षितता हा केवळ शीतल म्हात्रे यांचा प्रश्न नसून तो समस्त महिलांशी निगडीत आहे. घोसाळकर पिता-पुत्रावर कारवाई करण्याऐवजी आमच्यावर निलंबनाची कारवाई का करता? हा कुठला न्याय. सत्ताधाऱ्यांना ऐकू येत नसल्याने नाईलाजाने सभागृहात शिट्टय़ा वाजवाव्या लागल्या.
– काँग्रेस नगरसेविका -पारुल मेहता
आता काँग्रेसच्या नगरसेविका गप्प बसणार नाहीत. काही वर्षांपूर्वी शिवसेनेच्या नगरसेविकांनी माझ्यावर हल्ला केला होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दूरध्वनी करून माझी विचारपूस केली होती. आता उद्धव ठाकरे शीतल म्हात्रे यांना दिलासा का देत नाहीत.
काँग्रेस नगरसेविका वकारुन्नीसा अन्सारी
हा महिलांच्या सन्मानाचा विषय असल्यामुळे आम्ही शीतल म्हात्रे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत़
– मनसे गटनेते संदीप देशपांडे
घोसाळकर पिता-पुत्राविरुद्ध कारवाई करीत नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज होऊ देणार नाही.
– काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा