मुंबई : गेल्या वर्षी जुलै महिन्यात वरळी येथे झालेल्या अपघात प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याच्यावर खुनाच्या आरोपांतर्गत खटला चालवण्याच्या मागणीसाठी मृत महिलेच्या पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची दखल घेऊन न्यायालयाने मुंबई पोलिसांना नोटीस बजावली व याचिकाकर्त्याच्या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

गेल्यावर्षी ७ जुलै रोजी मिहीर याने मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू गाडी चालवून प्रदीप नाखवा आणि त्यांची पत्नी कावेरी यांच्या दुचाकीला धडक दिली होती. धडकेनंतर अपघातात जखमी झालेल्या कावेरी यांना रुग्णालयात नेण्याऐवजी मिहीर याने त्यांना दोन किमीपर्यंत फरफटत नेले. परिणामी, कावेरी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, हा अपघात मिहीर याने नाही तर त्याचा चालक आणि प्रकरणातील सहआरोपी राजऋषी बिडावत याने केल्याचे भासवण्यात आल्याचा आरोप आहे. दोघांवरही सदोष मृत्युप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अपघाताची घटना आणि त्यानंतरची मिहीर याची कृती लक्षात घेता याप्रकरणी खुनाच्या आरोपांतर्गत गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.

हेही वाचा – आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कावेरी यांच्या शवविच्छेदन अहवालाचा दाखला त्यासाठी देण्यात आला आहे. त्यात अपघातानंतर फरफटत नेल्याने आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने कावेरी यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे, असे याचिकाकर्त्याने याचिकेत म्हटले आहे. तसेच, मिहीर याच्यावर खुनाच्या आरोपाप्रकरणी खटला चालवण्याची मागणी केली आहे. मागणीबाबत पोलिसांना पत्रव्यवहार केला होता, मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने याचिका दाखल केल्याचे नाखवा यांनी याचिकेत म्हटले आहे.

हेही वाचा – दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात मोहीम, अन्न आणि औषध प्रशासनाने दुधाचे १०६२ नमुने घेतले

न्यायमूर्ती रेवती मोहिते- डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने प्रदीप नाखवा यांच्या याचिकेची दखल घेऊन पोलिसांना नोटीस बजावली. तसेच, नाखवा यांच्या मागणीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.