मुंबई : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाने दोन पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण केले आहे. आता ५५६ घरांचा समावेश असलेल्या या इमारतींना म्हाडा प्राधिकरणाकडून निवासी दाखला (ओसी) प्राप्त झाला आहे. त्यामुळे या घरांचा ताबा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता घरांचा ताबा देण्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळण्याची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाल्यानंतर घरांचा ताबा देण्याचा सोहळा पार पडणार आहे.

वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावला जात आहे. या तिन्ही ठिकाणी मागील काही वर्षांपासून पुनर्वसित इमारतींच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळीत ३३ पुनर्वसित इमारती बांधण्यात येणार आहेत.

यापैकी १३ पुनर्वसित इमारतींची कामे सध्या सुरू असून

दोन इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. या इमारतींमध्ये पाणी आणि वीज पुरवठ्याचीही सोय करून देण्यात आली आहे. तर अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने काही दिवसांपूर्वी या इमारतींना निवासी दाखला घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अखेर ही प्रक्रिया पूर्ण झाली असून या इमारतींना निवासी दाखला प्राप्त झाला आहे. संबंधित विभागाकडे हा दाखला सुपूर्द केला जाईल, अशी माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. निवासी दाखला मिळाल्याने आता ५५६ घरांच्या चावी वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप करण्याचा निर्णय म्हाडाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन लवकरात लवकर चावी वाटप करण्याचे नियोजन असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

‘या’ चाळीतील रहिवाशी जाणार मोठ्या घरात

मुंबई मंडळाने राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुनर्वसित इमारतींचे बांधकाम सुरू असतानाच बीडीडी चाळीतील रहिवाशांना पुनर्वसित इमारतीतील घरांची हमी दिली आहे. सोडतीद्वारे कोणत्या रहिवाशाला कोणत्या इमारतीत कितव्या मजल्यावर आणि किती क्रमांकाचे घर मिळणार याची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार निवासी दाखला मिळालेल्या दोन इमारतींसाठीही याआधीच सोडत काढण्यात आली आहे. या ४० मजली इमारतीमधील ५०० चौ. फुटाच्या घरात वरळीतील चाळ क्रमांक ३०, ३१ आणि ३६ मधील रहिवाशी रहायला जाणार आहेत.