मुंबई : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत वरळीतील ३०, ३१ आणि ३६ क्रमांकाच्या चाळीतील अंदाजे ४७० हून अधिक रहिवाशांना म्हाडाच्या मुंबई मंडळाने संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले होते. तर आता ४७० सह एकूण ५५६ घरांचा प्रत्यक्ष ताबा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई मंडळाच्या सर्वेक्षणात संक्रमण शिबिरातील ८० गाळे वरळीतील रहिवाशांनी भाड्याने दिल्याची माहिती समोर आली आहे. हे नियमांचे उल्लंघन असून संक्रमण शिबिराचे गाळे योग्य प्रकारे रिकामे करून मंडळाच्या ताब्यात यावेत यासाठी मंडळाने आता संक्रमण शिबिरातील सर्व रहिवाशांना घराचा ताबा घेण्यासाठी हमी पत्र बंधनकारक केले आहे. हे हमी पत्र दिल्यानंतर घराची चावी देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
मंडळाच्या या निर्णयावर वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वेक्षणात ज्या रहिवाशांनी घरे भाड्याने दिली आहेत, त्यांच्याकडून हमीपत्र घ्या, त्यांच्यावर कारवाई करा, पण सरसकट सर्वांना हमी पत्र का असा प्रश्न रहिवाशांनी केला आहे. हमी पत्र प्रक्रियेमुळे घराचा ताबा मिळण्यास वेळ लागणार असून गणेशोत्सव नव्या घरात साजरा करता येणार नसल्याचे म्हणत रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत वरळीतील ४० मजली दोन पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तर गुरुवार, १४ ऑगस्टला मोठ्या थाटामाटात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६ जणांना प्रातिनिधिक स्वरुपात घरांच्या चावीचे वाटप केले. चावी वाटपाचा सोहळा झाला खरा, पण अद्याप प्रत्यक्षात घराचा ताबा मिळालेला नाही. १६ रहिवाशांना केवळ वितरण पत्र देण्यात आले असून हमी पत्र घेत त्यांना ताबा पत्र आणि चावी वाटप केले जाणार आहे. १६ रहिवाशांना येत्या काही दिवसात ताबा मिळेल, पण उर्वरित रहिवाशांचे काय असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
मुंबई मंडळाकडून सोमवारपासून तीनपैकी इमारत क्रमांक ३१ मधील रहिवाशांना वितरण पत्र देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्याकडून हमी पत्र घेऊन ताबा पत्र वितरीत करून घराची चावी देण्यात येणार आहे. त्यानंतर ३० आणि ३६ क्रमांकाच्या इमारतीतील रहिवाशांना वितरण पत्र वितरीत करून पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया लक्षात घेत प्रत्यक्ष घराचा ताबा मिळण्यासाठी विलंब होणार असल्याचे रहिवाशी सुरेश खोपकर यांनी सांगितले. हमी पत्रामुळे रहिवाशांमध्ये नाराजी असल्याबद्दल मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरिकर यांना विचारले असता त्यांनी हमी पत्र बंधनकारक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
मुंबई मंडळाने सुमारे ४७० रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले होते, मात्र आमच्या सर्वेक्षणात संक्रमण शिबिरातील ८० गाळे वरळीतील संबंधित गाळेधारकाने भाड्याने दिल्याचे उघड झाले आहे. हे नियमांचे उल्लंघन असून भाड्याने दिलेले गाळे योग्य प्रकारे रिकामे करून घेण्यासाठी संक्रमण शिबिरातील रहिवाशांना हमीपत्र बंधनकारक केल्याचेही बोरिकर यांनी सांगितले. त्याचवेळी हमी पत्राच्या प्रक्रियेला अधिक वेळ लागणार नाही, आम्ही तातडीने ही प्रक्रिया करुन देऊ, असेही ते म्हणाले. रहिवाशांनी मात्र मंडळाच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित केले आहे. मागील कित्येक महिन्यांपासून घरांचा ताबा देण्याची चर्चा सुरू होती, ताबा देण्याच्या काही दिवस आधीच हमी पत्र घेण्याची प्रक्रिया का सुरू केली नाही. चावी देण्याचा सोहळा झाल्यानंतर हमी पत्र का मागण्यात येत आहे, मग सोहळ्याची घाई का केली, असाही प्रश्न येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. तर गणेशोत्सव नव्या घरात साजरा होणार नाही याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे.
दरम्यान, संक्रमण शिबिराचे गाळे ज्या ८० रहिवाशांनी भाड्याने दिली आहेत, त्यांची नावे मंडळाकडे आहेत. मंडळाने त्यांच्याविरोधात कारवाई करावी, इतर रहिवाशांना त्याचा त्रास का, असाही प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. त्याच वेळी करारात घराची चावी मिळाल्यापासून एका महिन्यात संक्रमण शिबिर रिकामे करून देण्याचे अट आहे, तर हमी पत्रात मात्र १५ दिवसांत गाळा रिकामा करून देण्याची अट का समाविष्ट करण्यात आली. हा फरक का, १५ दिवसांत घर कसे रिकामे करणार, असाही सवाल रहिवाशांनी केला आहे. मुंबई मंडळ मात्र रहिवाशांना आवश्यक ते सहकार्य करून शक्य तितक्या लवकर घराचा ताबा देऊ असे सांगताना दिसत आहे.