मुंबई : अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी कक्षाने मालाड येथे एका नायजेरियन नागरिकाला अटक करून सुमारे २ कोटी रुपये किंमतीचे २०० ग्राम कोकेन जप्त केले. खार पोलिसांनीही गस्तीदरम्यान एका नायजेरियन नागरिकाला अटक करून साडेचाल लाख रुपयांचे कोकेन जप्त केले. अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी पथकातील अधिकारी मुंबई शहरातील अंमली पदार्थाची खरेदी-विक्री करणाऱ्यांचा शोध घेत होते.

मालाडच्या ऑरलेम मार्वे रोड येथील जे.पी. कॉलनी येथे एक परदेशी नागरिक शनिवारी संशयास्पदरित्या वावरत असल्याचे पथकाला दिसले. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे २०० ग्रॅम कोकेन सापडले. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात २ कोटी रुपयेे किंमत आहे. आरोपीकडून तीन मोबाइल आणि एक वाहनही जप्त करण्यात आले. आरोपी सराईत गुन्हेगार आहे. तो बेकायदेशीररित्या भारतात रहात होता, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यातील कलम ८ (क), २१(ब), तसेच परदेशी नागरिक कायद्याच्या कलम १४ अ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहायक पोलीस आयुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष) सुधीर हिरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक संतोष सांळुखे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खारमध्ये साडेचार लाखांचे कोकेन जप्त

खार पोलिसांनी शनिवारी गस्तीदरम्यान खार रेल्वे स्थानकाजवळ ३२ वर्षीय नायजरेयीन नागरिकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे कोकेने सापडले. आरोपी नालासोपारा येथे वास्तव्यास आहे. त्याच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलम ८ (क), २१(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक वैभव काटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक देवीदास पडळवार, दिनेश शिर्के, कुंदन कदम, सुमित अहिवले, महेश लहामागे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली