लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई: वरळी सीफेस येथील समुद्रात ४ जुलै रोजी गोणीमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला होता. पाण्यामुळे मुलीचा चेहरा खराब झाल्याने तिची ओळख पटवणे कठीण झाले होते. त्यामुळे न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या मदतीने या मुलीच्या चेहऱ्याची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. ही मुलगी १५ ते १७ वयोगटातील असून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह समुद्रात फेकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मृतदेहाची माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

वरळी सीफेस येथील आयएनएस त्राता या नौदलाच्या स्थळामागील समुद्रात ४ जुलै रोजी गोणीत एक मृतदेह सापडला होता. गोणीतून दोन पाय बाहेर आल्यामुळे तेथील नागरिकांना मृतदेहाबाबत समजले. हा मृतदेहाची याबाबत अजून ओळख पटलेली नाही, मात्र ही मुलगी १५ ते १७ वयोगटातील असून मृतदेहाचे हात, पाय तुटलेल्या स्थितीत होते. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठविण्यात आला होता. याप्रकरणी वरळी पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा-अखेर मुहूर्त सापडला; यशवंत चव्हाण सेंटरमध्ये यादिवशी म्हाडा सोडत काढणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी पोलिसांनी स्वतः तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. तपासणीत घटनास्थळी सीसी टीव्ही कँमेरा नसल्याचे आढळले आहे. तसेच पाण्यामुळे मृतदेहाचा चेहरा खराब झाल्यामुळे तिची ओळख पटवणे कठीण झाले आहे. त्यामुळे वरळी पोलिसांनी केईएम रुग्णालयातील तज्ज्ञांच्या मदतीने चेहऱ्याची पुनर्निर्मिती केली आहे. त्याद्वारे एक प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. त्याचे छायाचित्र वितरीत केले असून पोलिसांनी मृतदेहाची माहिती देणाऱ्याला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. याप्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी अपहरणाची तीन प्रकरणे सोडविली आहेत.