उत्तरपत्रिका न तपासताच विद्यार्थी अनुत्तीर्ण;  गुण एकाचे, उत्तरपत्रिका दुसऱ्याची

प्रचंड लांबलेले निकाल, त्यातले घोळ यांवरून विद्यापीठातील ‘महाभारत’ शमल्यानंतर आता ज्यासाठी विद्यार्थ्यांना कैक महिने वेठीस धरण्यात आले त्या मूल्यांकनातीलच नवनवीन गोंधळ उघड होत आहेत. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळू लागल्यानंतर त्यातील एकेक बाबी समोर येत असून  एका विद्यार्थ्यांला उत्तरपत्रिका न तपासताच आठ गुण देऊन अनुत्तीर्ण करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्याचे गुण दिल्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांला पुढील प्रवेशाची संधी गमवावी लागली.

इतर सर्व विषयांत चांगले गुण असताना एका विषयांत अवघे आठ गुण मिळालेले पाहून संदेश इंगवले या विद्यार्थ्यांला धक्का बसला. त्याने मुंबई विद्यापीठाची विज्ञान शाखेची तृतीय वर्षांची (टी. वाय. बी.एस्सी.) परीक्षा दिली होती. आठ गुण मिळालेले पाहून त्याने उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीची मागणी विद्यापीठाकडे केली. हाती छायाप्रत आल्यावर विद्यापीठाच्या निकालांमधील घोळाचा नवाच प्रकार समोर आला. ७५ गुणांच्या उत्तरपत्रिकेतील एकही प्रश्न तपासला नसल्याचे छायाप्रतींवरून दिसून आले. उत्तरपत्रिका न तपासताच संदेशला आठ गुण देण्यात आले होते. दिलेले आठ गुणही दुसऱ्याच विद्यार्थ्यांचे आहेत. उत्तरपत्रिकेवरील गुण नोंदवण्यात आलेले पहिले पान दुसऱ्याच विद्यार्थ्यांचे आहे.

विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन होताना त्यावर विद्यार्थ्यांचा परीक्षा क्रमांक दिसत नाही. विद्यापीठाकडून प्रत्येक विद्यार्थ्यांला स्वतंत्र क्रमांक देण्यात येतो. संदेशने मागितलेल्या दोन्ही उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींवर दोन स्वतंत्र क्रमांक आहेत. त्यामुळे संदेशबरोबरच इतरही विद्यार्थ्यांच्या निकालात अशाच प्रकारे गोंधळ असण्याची शक्यता आहे. चुकीच्या निकालामुळे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला त्याला प्रवेश घेता आलेला नाही, अशी तक्रार मनविसेचे सुधाकर तांबोळी यांनी केली.

‘इतर विषयांत चांगले गुण असताना दोनच विषयांत कमी गुण असल्याचे दिसत होते. आठ गुण मिळाले असतील हे न पटल्यामुळे उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागितली. तेव्हा उत्तरपत्रिका तपासली नसल्याचे दिसले. एका विषयांत अनुत्तीर्ण झाल्यामुळे पुढी एमसीए अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता. तो घेता आला नाही,’ असे संदेश याने सांगितले.

विधी अभ्यासक्रमाची परीक्षा लांबणीवर

मुंबई :  मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुल येथे गुरुवारी विद्यार्थी संघटनांनी जोरदार निदर्शने केल्यानंतर विद्यापीठाला जाग आली असून पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्राची आणि तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्राच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला. नवनियुक्त प्रकुलगुरू प्रा. व्ही. एन. मगरे यांनी गुरुवारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तात्काळ निदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर झाल्यानंतर सहाव्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल, असे आश्वासन प्रा. मगरे यांनी दिले. विधी अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्याबाबत मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता.  पुनर्मुल्यांकनाचा निकाल दोन दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन विद्यापीठाकडून देण्यात आल्याचे स्टुडंट्स लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले.