मुंबई : उत्तर प्रदेशात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी दुपारी मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईतील नामांकित ज्येष्ठ उद्योगपती आणि उद्योगसमूहांशी योगी आदित्यनाथ हे बुधवारी सायंकाळी आणि गुरुवारी दिवसभर भेटी आणि बैठका घेऊन चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशातील गुंतवणूक संधी आणि राज्य सरकारकडून त्यांना मिळणाऱ्या विशेष सवलती याबाबत माहिती देऊन उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

योगी आदित्यनाथ हे आपल्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, मिहद्रा, गोदरेज, आदित्य बिर्ला समूह, बाँबे डाइंग, ब्रिटानिया, जेएसडब्ल्यू समूह, एशियन पेंट्स, हिताची, हिरानंदानी, कोका-कोला, मारुती सुझुकी, अशोका लेलँड्स, ओस्वाल इंडस्ट्रीजसह अनेक कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि ज्येष्ठ उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत. योगी आदित्यनाथ हे बुधवारी दुपारी मुंबईत येतील. त्यानंतर महाराष्ट्रात वास्तव्य असलेल्या उत्तर प्रदेशातील मान्यवरांशी चर्चा करतील. उत्तर प्रदेशात चित्रनगरी (फिल्मसिटी) उभारण्यात येत असून त्यादृष्टीने बॉलीवूडमधील ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, कलावंत आदींशी ते बुधवारी सायंकाळी चर्चा करणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचबरोबर योगी आदित्यनाथ हे उद्योगपतींशी गुरुवारी दिवसभर चर्चा करून भेटीगाठी घेणार आहेत. अतिशय अविकसित राज्य असलेल्या उत्तर प्रदेशने गेल्या काही वर्षांत केलेली प्रगती आणि तेथील गुंतवणुकीच्या संधी व सवलतींबाबत योगी आदित्यनाथ उद्योगपती आणि उद्योगसमूहांच्या उच्चपदस्थांना माहिती देणार आहेत आणि गुंतवणुकीसाठी आमंत्रित करणार आहेत.