मुंबई: व्यस्त वेळापत्रक, अनियमित जीवनशैली आणि प्रचंड तणाव यामुळे तरुण कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना प्री-डायबिटीज, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि फॅटी लिव्हरचा त्रास वाढताना दिसत आहे.याविषयी वेळीच काळजी घेतली नाही तर मोठ्या आजारांचा धोका निश्चित असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कामाच्या व्यापात हल्लीची तरुणाई अनेकदा जेवण वगळतात, फास्ट फूडसारख्या पर्यायांवर अवलंबून राहतात आणि सतत दबावाखाली काम करतात. एकाच जागी बराच वेळ बसून काम करणे, कामाचे वाढते तास आणि अपुरी झोप तसेच झोपेच्या अनियमित वेळा या चयापचय प्रक्रियेत अडथळा निर्माण करतात. प्रक्रिया केलेले अन्न, शर्करायुक्त पेय आणि कॅफिनचे वारंवार सेवन, धूम्रपान किंवा अल्कोहोलच्या व्यसनाने चयापचय आणि जीवनशैली विकारांचा धोका वाढतो. जीवनशैली संबंधीत झालेल्या चुकीच्या बदलांमुळे प्री-डायबिटीज, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.

बऱ्याचदा एखादी व्यक्ती लक्षणे दिसू लागण्यापूर्वी काही महिने किंवा अगदी वर्षे जीवनशैलीसंबंधीत विकारांचा सामना करत असते. मधुमेहामुळे सुरुवातीला थकवा, तहान वाढणे किंवा वारंवार लघवी होणे, तर उच्च कोलेस्ट्रॉल अशी लक्षणे आढळून येतात व हळूहळू ते हृदयरोगास कारणीभूत ठरतात. उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी, चक्कर येणे किंवा दृष्टीदोषाच्या समस्या सतावतात आणि फॅटी लिव्हरमुळे पोटात अस्वस्थता किंवा जडपणा वाटू लागतो. जर याचे वेळीच व्यवस्थापन केले नाही तर ही परिस्थिती टाइप २ मधुमेह, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि यकृताच्या समस्येस कारणीभूत ठरु शकते असे मुंबईच्या अपोलो डायग्नोस्टिकच्या रिजनल टेक्निकल चीफ डॉ. उपासना गर्ग यांनी सांगितले.

जवळपास ५० टक्के तरुण कॉर्पोरेट व्यावसायिकांना प्री-डायबिटीज, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि फॅटी लिव्हरचा धोका सतावतो. हे लक्षात घेता कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना विशेषतः २५ ते ४५ वयोगटातील तरुणांनी नियमित (किमान दरवर्षी) आरोग्य तपासणी करावी. या जीवनशैलीशी संबंधित आजारांचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळीच निदान करणे गरजेचे आहे.यात प्री-डायबिटीजसाठी फास्टींग शुगर आणि एचबी१सी रक्त चाचणी, कोलेस्ट्रॉलसाठी लिपिड प्रोफाइल, उच्च रक्तदाबासाठी रक्तदाब निरीक्षण, ईसीजी आणि इकोकार्डियोग्राम, हृदयाच्या तसेच फॅटी लिव्हरसाठी यकृताचा कार्यासंबंधी चाचण्या आणि अल्ट्रासाऊंड यांचा समावेश आहे. या साध्या तपासणीमुळे वेळीच निदान व उपचार करण्यास मदत होऊ शकते. शिवाय संतुलित आहाराचे सेवन करणे, नियमित व्यायाम करणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि धूम्रपान आणि मद्यपान टाळणे गरजेचे आहे. बैठी जीवनशैली असलेल्या व्यक्तींनी थोड्या थोड्या अंतराने आपल्या जागेवरुन उठुन स्ट्रेचिंग करणे, चालणे, हलके व्यायाम करणे, संतुलित आहाराचे सेवन करणे आणि पुरेशी झोप घेतल्यास नक्कीच फायदा होईल असे केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले.

तरुण कॉर्पोरेट व्यावसायिकांना उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखरेची पातळी वाढणे आणि फॅटी लिव्हर यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढताना दिसत आहे. दर महिन्याला १० पैकी ४ लोक थकवा, वारंवार डोकेदुखी, चक्कर येणे आणि अकारण वजन वाढणे अशा इशारा देणाऱ्या लक्षणांची तक्रार करतात. या समस्या प्रामुख्याने सततचा ताण, कामाचा वाढता दबाव, डेडलाईनचा ताण आणि दीर्घकाळ बसून राहण्याच्या सवयीमुळे निर्माण होतात. अस्वस्थ आहार पद्धती, रात्री उशिरापर्यंत काम करणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हा धोका आणखी वाढतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आणि या समस्या वेळीच ओळखणे आवश्यक आहे. संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, तणावावर नियंत्रण ठेवणे, धूम्रपान आणि जास्त मद्यपान टाळणे गरजेचे आहे. प्रत्येकाने सक्रिय राहणे, चालणे-फिरणे, प्रक्रिया केलेले आणि गोड पदार्थ कमी करणे आणि योग व ध्यान करून तणाव कमी करणे आवश्यक आहे. याशिवाय डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा योग्य सल्ला पाळल्यास या आजारांवर नियंत्रण ठेवता येते असे झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. निमित नागडा यांनी सांगितले.