मुंबई : देश आणि राज्यात अंमली पदार्थ सेवनात युवा पिढी दिवसेदिवस गुरफटत चालली आहे. ही एक चिंतेची बाब आहे. अंमली पदार्थांचे पुरवठादार आणि अड्डे उध्वस्त करणाऱ्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. अंमली पदार्थ वितरणात कर्करोगग्रस्त महिलांचा वापर केला जात आहे. हे धक्कादायक आहे. ही साखळी उध्दवस्त करण्याचे एक मोठे आव्हान राज्यासमोर असून ही लढाई लढावी लागणार, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत व्यक्त केला.
राज्यात अंमली पदार्थांची तस्करी मोठया प्रमाणात वाढली असून सरकारचे त्यावर नियंत्रण नाही. शहरी भागापुरते मर्यादीत असलेले ही लोण आता कोकणपटयात (दापोली) पसरले आहे. अंमली पदार्थांचे जाळे आटोक्यात आणण्यात सरकराचे दुर्लक्ष होत असल्याची लक्षवेधी काँग्रेसचे भाई जगताप यांनी मांडली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकार करीत असल्यालेल्या उपापयोजना सांगणारे सविस्तर उत्तर दिले. अंमली पदार्थ सेवनाचे तरुणांमध्ये प्रमाण वाढले आहे. शाळा, महाविद्यालयाबाहेरील पान ठेल्यांवर अंमली पदार्थ मिळत असल्याने त्यांच्यावर निरंतर कारवाई केली जात आहे. अमेरिका, थायलंड सारख्या देशात हायड्रोगांजा सारख्या अंमली पदार्थाला मान्यता आहे.
देशात सर्व प्रकारच्या अंमली पदार्थावर बंदी असताना हा हायड्रोगांजा कुरियरने देशात येत आहे. नेपाळ, बांगलादेश मार्गाने अंमली पदार्थांचा पुरवठा केला जात आहे. त्याला रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. कुरियरने अंमली पदार्थ येत असल्याने कुरियर कंपन्यावर कारवाई करण्यात आली आहे. केवळ अंमली पदार्थ पुरवठादारांवर कारवाई न करता त्यामागील सूत्रधार शोधले जात आहेत. कर्करोग शेवटच्या टप्यात असलेल्या महिला पैसे मिळतात म्हणून अंमली पदार्थ वितरणात भूमिका बजावत असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.काही कृत्रिम अंमली पदार्थ एका कडईतही तयार करता येतात.
सहज अंमली पदार्थ न मिळाल्यास औषधांच्या दुकानावरील खोकल्याचे औषध मोठया प्रमाणात सेवन करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. डाॅक्टरांच्या औषध चिठ्ठीशिवाय औषध न देण्याचे सर्व दुकानांना आदेश असून दुकानाबाहेर सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याचे बंधनकारक आहे. अंमली पदार्थांची सायबर विक्री केली जात असल्याने पोलिसांनी ‘डार्कनेट’च्या १५ साईट बंद केल्या आहेत. अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती महत्वाची असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या लक्षवेधीच्या चर्चेत शिवाजीराव गर्जे, संजय केनेकर, डाॅ.परिणय फुके, संजय खोडके, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी भाग घेतला.