मृत्यू विश्लेषण समितीच्या अहवालात सूचित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई :  करोनाचा संसर्ग झालेल्या तरुण वयोगटातील रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी हायपोथायरॉईड, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्थूलपणा असलेल्यांना वेळेत उपचार देणे आवश्यक असल्याची सूचना मुंबईतील मृत्यूंचे विश्लेषण करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने नुकत्यात सादर केलेल्या अहवालात केली आहे.

शहरात सर्वाधिक मृत्यू ५० वर्षांपुढील रुग्णांचे झाले असले तरी २१ ते ४० वयोगटातील रुग्णांचेही नोंद घेण्याइतपत मृत्यू झाल्याचे या समितीने अधोरेखित केले. हे रोखण्यासाठी काही सूचना केल्या आहेत.

शहरातील मृत्यूंचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या अहवालानंतर वयोगट, लक्षणे दिसल्यापासून रुग्णालयात दाखल होण्याचा आणि दाखल झाल्यापासून मृत्यूपर्यंतचा कालावधी, रुग्णालयातील उपचार याचा विश्लेषणात्मक अभ्यास करत  समितीने दुसरा अहवाल तयार केला आहे.

पहिल्या टप्प्यात केलेल्या विश्लेषणामध्ये ४० वर्षांच्या आतील रुग्णांना प्रवासाचा इतिहास होता. परंतु दुसऱ्या टप्प्यात या वयोगटातील मृतांपैकी कोणीही प्रवास केलेला नाही. यातील बहुतांश रुग्णांना हायपोथॉयरॉईड, निदान न झालेला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्थूलता असल्याचे प्रामुख्याने दिसून आले आहे.

करोनाची लक्षणे दिसून आलेल्या तरुणांमध्ये असे आजार असल्यास त्यांच्या चाचण्या कराव्यात आणि नियमित देखरेख करावी. अलगीकरण केंद्राऐवजी ऑक्सिजनची सुविधा असलेल्या केंद्रामध्ये त्यांना दाखल करावे. दर सहा तासांनी ऑक्सिजनची पातळी तपासावी. रक्तदाब,मधुमेह, थायरॉईड पातळीपेक्षा अधिक असल्यास, चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्यास तातडीने गंभीर प्रकृतीच्या रुग्णांसाठीच्या करोना रुग्णालयांमध्ये दाखल करावे, अशा सूचना समितीने अहवालात दिल्या आहेत.

अन्य उपनगरीय रुग्णालये, ठाणे, पालघर, नवी मुंबई येथे डॉक्टरांना उपचाराची योग्य दिशा मिळण्यासाठी मुंबईतील खासगी आणि शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून योग्य उपचार पद्धती कोणत्या आणि कशा द्याव्यात याचीही या अहवालात नोंद केली आहे. ऑक्सिजन, रक्तदाबाची पातळी यानुसार रुग्णांचे वर्गीकरण, अत्यावश्यक उपचाराची गरज असलेल्या रुग्णांचे निदान यासाठीही काही मार्गदर्शक तत्त्वे या अहवालात समितीने मांडली आहेत.

शहरातील मृत्यूदरात घट

मृत्यूदरात महिनाभरात घट झाली असून तो ६.३३ टक्क्यांवरून ३.६ टक्क्यांपर्यंत  आला आहे. लक्षणे दिसून आल्यापासून रुग्ण दाखल होण्याचा कालावधी पूर्वी २० ते २५ दिवस होता. तो कमी झाला आहे.

टोसीलीझुमाब आणि रेमेदेसीवीर प्रभावशाली

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये गंभीर प्रकृतीच्या रुग्णांवर टोसीलीझुमाब या औषधाचा वापर केला असून ७० ते ८० टक्के रुग्ण बरे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा रेमदेसीवीर आणि टोसीलीझुमाब ही औषधे उपलब्ध होण्यासाठी तातडीने व्यवस्था करण्याची शिफारस समितीने केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young people with hypothyroidism diabetes and obesity need timely treatment zws
First published on: 31-05-2020 at 04:15 IST