संपुष्टात आलेले प्रेमसंबंध पुन्हा प्रस्थापित करण्यास नकार देणाऱ्या एकोणीस वर्षीय युवतीवर तिच्या माजी प्रियकराने कुऱ्हाडीने हल्ला केला. ही घटना सोमवारी दुपारी मिरा रोड येथील बेवर्ली पार्क येथे घडली. प्रियकराला पोलिसांनी अटक केली असून जखमी तरुणीची प्रकृती आता स्थिर आहे.
अमित विश्वकर्मा (वय ३०) या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या युवकाचे या तरुणीशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते; परंतु ते वर्षभरापूर्वी संपुष्टात आले.
अमितची गुन्हेगारी पाश्र्वभूमी व व्यसनीपणा समजल्यानंतर तरुणीने त्याच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. पण अमितने पुन्हा तरुणीच्या आयुष्यात प्रवेश केला. सोमवारी तरुणी आपल्या भावाला शाळेत सोडून घरी परतत असताना अमितने तिला गाठले व प्रेमसंबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची गळ तरुणीला घातली. मात्र तरुणीने त्याला नकार दिला. संतापलेल्या अमितने हातातल्या कुऱ्हाडीने तिच्या मानेवर वार केले. हा हल्ला खोलवर झाल्याने तरुणी गंभीर जखमी झाली. तिला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा पोलिसांनी अमितला अटक केली. त्याला २५ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.