मुंबई : आखाती देशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत ट्रॉम्बेमधील एका तरुणाची पती-पत्नीने अडीच लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी यामध्ये गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

ट्रॉम्बेतील चित्ता कॅम्प परिसरात सय्यद असगर (४७) हा पत्नीसह वास्तव्यास आहे. टॅक्सी चालवून घरखर्च भागत नसल्याने त्याने आखाती देशात नोकरी करण्याचे ठरवले. ही बाब त्याने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला सांगितली. तिच्या ओळखीतली एक महिला आखाती देशात तरुणांना नोकरीसाठी पाठवत होती. त्यामुळे तरुणाने तिच्याकडून महिलेचा मोबाइल क्रमांक घेऊन तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तरुणाने महिलेची भेट घेऊन त्याच्यासाठी आणि पत्नीसाठी कतार देशात नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. आरोपी महिला आणि तिच्या पतीने तत्काळ दोघांचे कागदपत्र घेऊन त्यांच्याकडून आरोग्य तपासणी आणि इतर खर्च असे एकूण अडीच लाख रुपये घेतले. मात्र अनेक महिने उलटल्यानंतरही त्यांना आखाती देशात नोकरीसाठी कुठल्याही प्रकारचा फोन आला नाही.

हेही वाचा – म्हाडाच्या मुंबईतील १७३ दुकानांचा ११ जूनला ई लिलाव

हेही वाचा – मुंबई : स्वच्छ केलेल्या नाल्यांमध्ये पुन्हा तरंगता कचरा, नाल्यांमध्ये कचरा न टाकण्याचे पालिकेचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत तरुणाने महिलेशी अनेकदा संपर्क केला. मात्र ती नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देत होती. त्यानंतर महिलेशी संपर्कच न झाल्याने तरुणाने याबाबत ट्रॉम्बे पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी महिला आणि तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.