मुंबई: मोबाइलवर आलेली एक लिंक उघडणे भांडुप परिसरातील एका तरुणाला मोठी महागात पडली. तरुणाने लिंक उघडल्यानंतर पोलीस असल्याची बतावणी करून एका भामट्याने त्याच्याकडून पावणेतीन लाख रुपये उकळले. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
तक्रारदार तरुण १९ वर्षांचा असून तो महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. महिन्याभरापूर्वी त्याच्या मोबाइलवर एक अश्लील व्हिडीओ असलेली लिंक आली होती. ही लिंक उघल्यानंतर एका तरुणीने त्याला काही अश्लील मेसेज करून त्याच्याकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. तरुणाने तत्काळ तिला पैसे पाठवले. त्यानंतर काही वेळातच त्याला एका व्यक्तीने फोन केला. आपण उत्तर प्रदेश पोलीस दलातील अधिकारी असल्याचे त्याने सांगितले. तुझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून तो मिटवण्यासाठी त्याने त्याच्याकडे काही पैशांची मागणी केली.
गुन्हा दाखल झाल्याचे ऐकून तरुण अधिकच घाबरला. आपली कुटुंबात बदनामी होईल या भीतीने तो गर्भगळीत झाला. त्यामुळे आरोपीने सांगितल्याप्रमाणे त्याने त्याच्या खात्यात एकूण २ लाख ७४ हजार रुपये पाठवले. मात्र त्यानंतरही आरोपी पैशांची मागणी करीत होता. त्यामुळे तरुणाने ही बाब त्याच्या आईला सांगितली. आईने याबाबत सायबर पोलीसात तक्रार दाखल केली. त्यानंतर भांडुप पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.