मुंबई : नेपाळमधील तरुणांच्या आंदोलनातून झालेल्या सत्तांतरानंतर आणि लडाखमधील उग्र निदर्शनांमुळे चर्चेत आलेली ‘जेन झेड’ ही पिढी डिजिटल तंत्रज्ञानात पारंगत, पारंपरिक चौकटी मोडणारी आणि टीकेची धनी म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावरील रील्स, मिम्समधून ज्या पिढीवर टीका होते, त्याच जेन झेड चे एक सकारात्मक चित्र मात्र गडचिरोलीत उमटले आहे.
राज्यातील आणि देशातील विविध भागांतून दर महिन्याला ६० ते ७० युवक आपल्या जीवनाचे प्रयोजन आणि समाजातील प्रश्नांना विधायक मार्ग शोधण्यासाठी गडचिरोलीत ‘निर्माण’च्या शिबिरात सहभागी होत असतात. तरुणाईचा हा प्रवास खरच कौतुकास पात्र आहे. त्याचप्रमाणे ही यशोगाथा साकारणाऱ्या डॉ बंग कुटुंबीयांच्या ‘निर्माण’ संस्थेच्या या उपक्रमाची अंमलबजावणी देशात जागोजागी झाल्यास जेन झेड तरुणाईला एक सामाजिक बांधिलकीचा विधायक रस्ता मिळेल.
गडचिरोलीतील डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांचे सामाजिक कार्य सर्वश्रुत आहे. त्याच्या‘सर्च’ संस्थेने गेल्या चार दशकांपासून बालमृत्यू कमी करणे व सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रांत भरीव काम केले आहे. २००६ मध्ये त्यांनी तरुणांसाठी ‘निर्माण’ हा उपक्रम सुरू केला. ‘युथ फॉर पिसफुल लाईफ’ हे ‘निर्माण’चे ब्रीद आहे. आजवर ३ हजारांहून अधिक युवकांनी या शिबिरातून समाजकार्याची दिशा मिळवली असून सप्टेंबरमध्ये १६वे शिबिर नुकतेच संपन्न झाले. यावेळी सहभागी झालेल्यांपैकी बहुतांश युवक जेन झेड होते.
विधायक दृष्टिकोन
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस विद्यार्थी मानस सेलोकर हा १९ वर्षांचा तरुण सांगतो, नेपाळमधील आंदोलन सुरुवातीला अहिंसक होते पण सोशल मीडियावर बंदी आल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटली. आमची पिढी हक्कांबाबत जागरूक आहे. भ्रष्टाचार, नागरी समस्या यावर चर्चा करते. मात्र भारतात लोकशाही आहे, त्यामुळे आम्ही विधायक मार्गाने बदल घडवू इच्छितो.
मानस रामटेक परिसरात वृक्षारोपण आणि गरीबांसाठी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या कामात सक्रिय आहे. ‘निर्माण’च्या माध्यमातून स्वतःच्या जीवनाचा हेतू समजून घेणे, या उद्देशाने तो या शिबिरात सहभागी झाला होता.नाशिकच्या के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील यश शिंदे हा दुसरा १९ वर्षांचा म्हणतो, समाजासाठी काम करण्याची इच्छा होती त्यामुळेच योग्य दिशा मिळावी म्हणून मी ‘निर्माण’मध्ये आलो.
पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी अशोक सोळंके (२४) सांगतो, सामाजिक भान विकसित करण्यासाठी ‘निर्माण’सारखी शिबिरे उपयुक्त ठरतात. मी मुळचा परभणीचा आहे. स्थलांतर, व्यसन या आमच्या भागातील मोठ्या समस्या आहेत. सामाजिक प्रश्नांकडे कसे पाहिले पाहिजे, याचे मार्गदर्शन आणि समाजकार्यसाठी आवश्यक दिशा या शिबिरातून मिळाल्याचेही तो सांगतो. अशोक त्यांच्या महाविद्यालयामार्फत सुरू असलेल्या कायदा मदत केंद्रात कार्यरत असतो.
सध्या ‘निर्माण’च्या कार्याची धुरा डॉ. राणी व अभय बंग यांचा मुलगा अमृत व त्यांचे पाच सहकारी सांभाळत आहेत. अमेरिकेतून व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अमृत बंग यांनी सांगितले की, आजपर्यंत साठ टक्के मुले व चाळीस टक्के मुलींनी ‘निर्माण’चा अभ्यासक्रम यशस्वीपणे पार पाडला आहे.
यातील ३५ टक्के वैद्यकीय क्षेत्रातील तर ३० टक्के हे अभियांत्रिकी शाखेतील होते. आठ दिवसाच्या तीन कार्यशाळा यासाठी घेतल्या जातात. यात नेमके काय करायचे आहे हे समजून घेण्यासाठी आधी स्वत:ची ओळख करून घेतली जाते. सामाजिक कार्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी विचारांची खोली व रुंदी वाढविण्याबरोबरच बौध्दिक बैठक तयार करण्यावर भर दिला जाते. त्यानंतर गडचिरोलीतील दुर्गम गावातील एखाद्या झोपडीत आदिवासींबरोबर काही काळ राहावेही लागते.
मोठय़ा संख्येने तरूण सामाजिक कार्याकडे वळू पाहात असल्यामुळे ‘निर्माण’मधील प्रवेश आता सोपा राहिलेला नाही. अर्ज, मुलाखती आदी सोपस्कर पार पडल्यानंतर निवड करण्यात येते. सामान्यपणे डॉक्टर, अभियंता, अभिनेता अथवा राजकारण्यांची मुले आपल्या वडिलांचाच पेशा स्विकारताना दिसतात. तथापि ‘निर्माण’मुळे समाजसेवेच्या चाकोरीबाहेरील वाटेवर चालणाऱ्या युवकांची पिढीच आता दरवर्षी ‘निर्माण’ होऊ लागल्याचे अमृत यांनी सांगितले.
भारतातील जेन झेडवर समाजमाध्यमांचा मोठा प्रभाव आहे. या आभासी जगापलीकडील खऱ्या समस्यांशी या पिढीची गाठ पडणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानात निपुण आणि समाजासाठी काम करण्याची इच्छा असलेल्या या तरुणांना जीवनाचे ध्येय शोधता आले तर सकारात्मक सामाजिक बदल घडवण्याची संधी त्यांना मिळू शकते.या तरुणाईचा समाजातील प्रश्नांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.
खऱ्या-खुऱ्या जगाशी आणि त्यातील समस्या व समस्याग्रस्तांशी या पिढीची गाठ पडणे आवश्यक वाटते. तसे झाल्यास, तंत्रज्ञान वापरण्यात पटाईत आणि समाजासाठी चांगल करण्याची इच्छा असलेली ही पिढी आपली ताकद वापरून समाजात खूप काही चांगल करू शकेल. यातूनच सकारात्मक सामाजिक बदल घडतील असा विश्वास अमृत बंग यांनी व्यक्त केला.
शिबिरात सहभागी होण्यासाठी संपर्क क्रमांक निर्माण,सर्च,शोधग्राम, मु.पो. चातगाव, तालुका धानोरा, जिल्हा – गडचिरोली, पिन – 442606
मोबाईल क्रमांक – 87676 80508
इमेल – contact.nirman@gmail.com
वेबसाईट – https://nirman.mkcl.org/