मुंबई : एका यूट्यूबर तरुणीचे अश्लील छायाचित्र तयार करून समाज माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी आसाम आणि वसई येथून दोघांना अटक केली. आरोपींनी बनावट प्रोफाईलच्या माध्यमातून बदनामी केल्याचा आरोप आहे.

नंदलाल बडेला (२०) आणि अंकुर देब (१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बडेला हा वसईमधील, तर देब हा आसामचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने २५ वर्षीय युट्यूबर तरुणीची अश्लील छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित केली होती. ती छायाचित्रे तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी अमेरिकेतील एका समाज माध्यमावर ती प्रसारित केली होती. तसेच तिचे नग्न छायाचित्र विकल्याचाही आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला होता. तर दुसऱ्या आरोपीने तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार केले आणि तक्रारदाराचे अश्लील छायाचित्र तयार करून प्रसारित केले होते. त्यामुळे तिची बदनामी झाली होती. याप्रकरणी तरुणीने १८ ऑक्टोबर २०२२ रोजी पोलिसात तक्रार दाखल केली आणि हा प्रकार ९ सप्टेंबरपासून सुरू असल्याचे तिने सांगितले.

हेही वाचा – वर्धा : जंगलातील थरार! तरबेज बिबट व लबाड कोल्ह्यामध्ये जोरदार झटापट..

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तांत्रिक तपशीलांचे विश्लेषण करून तक्रारदाराचे अश्लील छायाचित्र तयार करणाऱ्यांचा माग काढला आणि आरोपी नंदलाल बडेला याला वसई येथून अटक केली. तसेच बनावट इंस्टाग्राम खात्याचे तांत्रिक विश्लेषण करून उपनिरीक्षक राहुल कोकाटे यांचे पथक आसामला गेले आणि आरोपी देबला तेथून अटक केली.

हेही वाचा – ‘ओबान’ चित्ता पुन्हा पळाला, थेट वाघांच्या अधिवासात शिरला..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३४५ (ड) (पाठलाग करणे), ५०९ सह (अश्लील शब्द, हावभाव किंवा कृती) माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६७ (इलेक्ट्रॉनिक स्वरुपात अश्लील साहित्य प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे) आणि ६७ (अ) (इलेक्ट्रॉनिक माध्यमावर अश्लील छायाचित्र प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. कोणाच्या सांगण्यावरून आरोपींनी हे कृत्य केले याबाबत पोलीस तपास करीत आहेत.