मुंबई : कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराचा अवतार म्हणजेच ‘दशावतार’ प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. कलात्मकतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत तयार करण्यात आलेला ‘दशावतार’ हा भव्य मराठी चित्रपट १२ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट महाराष्ट्रापलीकडे जागतिक स्तरावरही गाजू लागला असून न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर ‘दशावतार’ची झलक परदेशातील लोकांनी अनुभवली आहे. या चित्रपटातील दृश्ये टाईम्स स्क्वेअरवरील मोठ्या स्क्रीनवर पाहताच अनेकजण थक्क झाले.
‘दशावतार’ मराठी चित्रपट महाराष्ट्रासह देशातील प्रमुख शहरात आणि परदेशातही १२ सप्टेंबरलाच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्रातील रूढी, परंपरा, संस्कृती, दमदार कथा आणि आधुनिक सिनेतंत्रातून निर्माण झालेल्या भव्यतेचा संगम असलेल्या ‘दशावतार’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठी अस्मिता आणि परंपरेचा सोहळा जागतिक स्तरावर पोहोचला आहे.
‘दशावतार ही महाराष्ट्राच्या मातीतली गोष्ट आहे. मात्र त्याचा विषय, त्यामधील पात्रे आणि दिसणारा निसर्ग हा वैश्विक स्तरावर सहज आपलासा वाटणारा आहे. आता न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर टीझर प्रदर्शित होणे ही आमच्या मेहनतीला मिळालेली आंतरराष्ट्रीय दाद आहे. आपल्या मराठीचा डंका सातासमुद्रापार वाजत असल्याचा एक मराठी माणूस म्हणून मला अभिमान आहे’, असे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सांगितले.
तर झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, ‘दशावतार’ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर प्रदर्शित व्हावा, हा आमचा ध्यास होता. टाईम्स स्क्वेअरवरील झळकलेला टीझर हे त्या जागतिक प्रवासाचे पहिले पाऊल आहे. आता जगभरातील प्रेक्षक ‘दशावतार’ला कसा प्रतिसाद देतात, हे पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत’.
झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ चित्रपटात मराठीतील दिग्गज कलाकारांचा सहभाग आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. गुरू ठाकूर यांचे संवाद व गीते, ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे संगीत आणि दमदार निर्मितीमुळे हा चित्रपट एक मोठा सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.