गोविंदा पथकांकडून सुरक्षेच्या नियमाचे पालन करण्यास टाळाटाळ केल्यामुळे मुंबईत ११७हून अधिक गोविंदा जखमी झाले आहे. नवी मुंबई व पालघरमध्ये दोन जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. गोविंदा पथकांनी दिलेले शून्य अपघाताचे आश्वासन फोल ठरले असून जखमींमध्ये अनेक १४ वर्षांखालील मुलांचाही समावेश आहे.

दरवर्षी दहीहंडीच्या दिवशी सुरक्षिततेचे पालन न केल्याने अनेक गोविंदा जखमी होतात. दहीहंडीत अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याने कायमचे अपंगत्व आल्याच्या घटनाही अनेक आहेत. यंदाच्या वर्षी ११७ गोविंदा जखमी झाले असून यातील अनेक गोविंदा रुग्णालयात उपचार घेत आहे. गेल्या वर्षी मुंबईत १६२ गोविंदा जखमी झाले होते. यातील ११४ गोविंदाना बाह्य़ रुग्णविभागात उपचार देण्यात आले व ४८ गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व एक गोविंदाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. २०१५च्या तुलनेत २०१६ मध्ये जखमी गोविंदांची संख्या जास्त होती. २०१५ साली १२९ गोविंदा जखमी झाले होते व दहीहंडी बांधताना खांब डोक्यावर पडून एकाचा मृत्यू झाला होता. २०१४ साली सर्वाधिक २०२ गोविंदा जखमी झाले होते. शीव रुग्णालयात सोनू एस (१३) व रोहन कोलेनूर (१२) या अल्पवयीन गोविंदावर उपचार करण्यात आले असून उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

शीव रुग्णालयात आलेल्या पाच जखमी गोविंदांना डोक्याला जखम झाली असून केईएममधील तीन गोविंदा निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. भरधाव वेगाने दुचाकी चालविणारे चार ते सहा गोविंदांच्या अपघातामध्ये पाय व डोक्याला जबर मारहाण झाली आहे. यामध्ये वीरेंद्र विश्वकर्मा (१९) व चिराग पांचाळ यांचा समावेश असून दुचाकीच्या अपघातात यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दहीहंडीमध्ये जखमी झालेल्या गोविंदांना तातडीने उपचार घेता यावेत यासाठी पालिका रुग्णालयाच्या अपघात विभागासमोर गोविंदाला उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी सुमारे १० चाकी खूर्ची ठेवण्यात आल्या होत्या. त्याशिवाय गोविंदावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा विशेष चमूही ठेवण्यात आला होता.

ठाण्यात सहा गोविंदा जखमी

ठाण्यात दहीहंडीसाठी थर रचताना एकूण सहा गोविंदा किरकोळ जखमी झाले. यातील सिद्धेश म्हसवणे (१२) या गोविंदावर जिल्हा शासकीय रुग्णालयात तर रितेश कनोजिया (११) याच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू होते. तर रोहन पवार (२१), भरत गुटकर (१७), सुलतान शेख (१८), अंकित भोईर (१८) यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन सोडून देण्यात आले. १४ वर्षांखालील गोविंदांना र्निबध घातले असतानाही कळवा येथील वाघोबानगर परिसरात रितेश कनोजिया हा ११ वर्षीय मुलगा थरावर चढताना जखमी झाला. त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून सांगण्यात आले.